२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:31 IST2025-05-09T10:24:21+5:302025-05-09T10:31:01+5:30

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट करून हल्ला केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली. जवळपास १०० हून अधिक दहशतवादी हल्ल्यात ठार झाले. त्यात कुख्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख कमांडर अब्दुल रौफ असगरचा समावेश होता.
रौफच्या मृत्यूची बातमी मिळताच भारताच्या यशाचं सगळ्यांनी कौतुक केले. भारताच्या या कारवाईमुळे इस्त्रायल आणि अमेरिकाही खुश झाला आहे. अमेरिका-इस्त्रायली लोकांनी Thank You India असं म्हणत भारताचं कौतुक करत आहेत. त्यामागे नेमकी काय कहाणी आहे जाणून घेऊया.
जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रौफ असगर हा अमेरिका आणि इस्त्रायल दोन्ही देशांचा कट्टर शत्रू होता. ही शत्रूता वाढण्याचं कारण होते डेनियल पर्ल...पत्रकार डेनियलच्या हत्येतील मुख्य आरोपी रौफ होता. २००२ साली अमेरिकेतील ज्यू पत्रकार डेनियल पर्लची हत्या करण्यात आली होती.
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांना मारले होते. त्यात बायकांसमोर त्यांच्या नवऱ्यांची हत्या करण्यात आली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, डेनियल पर्ल वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार होते. जानेवारी २००२ साली कराचीत त्यांचे अपहरण झाले, जेव्हा ते पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील कनेक्शनचा तपास करण्यासाठी पोहचले होते. अपहरणानंतर एक महिन्यांनी डेनियल पर्ल यांची क्रूर हत्या केल्याचा व्हिडिओ समोर आला होता
डेनियलच्या हत्येचा व्हिडिओ पाहून जग स्तब्ध झाले होते. पर्ल यांच्या हत्येचा मास्टरमाईंड उमर सईद शेख होता, ज्याने १९९९ साली इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण केले होते. या अपहरणामागेही अब्दुल रौफ असगरचा हात होता. ज्याला कंधार कांड नावाने ओळखले जाते.
२००१ च्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर डेनियल पर्लला दक्षिण आशिया ब्यूरो प्रमुख म्हणून भारताच्या मुंबईत तैनात केले होते. ते दहशतवाद आणि अल कायदा यांच्या नेटवर्कचा रिसर्च करत होते. एका रिसर्चमधून ते पाकिस्तानच्या कराचीपर्यंत गेले परंतु तिथे अपहरण झाले. त्यानंतर पर्लचे हातात बेड्या घातलेले फोटो, डॉन पेपरचा फोटो समोर आले. पर्लचा शीर कलम केल्याचे पुढे आले.
रौफ असगरच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा झाल्यानंतर पत्रकार असरा नोमानी यांनी X वर पोस्ट केली. त्यात माझा मित्र डेनियल २००२ साली बहावलपूर येथे गेला होता. केवळ नोटबुक आणि पेनसह..तिथे त्याने दहशतवादी ठिकाणांचा शोध घेतला. त्याला जोखीम घ्यायची नव्हती परंतु त्याचा जीव धोक्यात येईल याची त्याला कल्पना नव्हती असं त्यांनी सांगितले.
तर अमेरिकन कार्यकर्ता एमी मेक यांनीही असगरच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केला. भारताने पर्लच्या हत्येचा बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरमधून दहशतवादी गड उद्ध्वस्त केले. पाश्चिमात्य देशांनी इस्लामिक दहशतवादाशी कसे लढले पाहिजे हे भारताकडून शिकायला हवे असं त्यांनी म्हटलं.
दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला जगभरातून समर्थन मिळत आहे. अमेरिकेनेही भारताला त्यांच्यावरील कारवाईला उत्तर देण्याचा अधिकार आहे असं म्हटले. ब्रिटन, फ्रान्स, इस्त्रायल, नेदरलँडसह पनामानेही भारताला पाठिंबा दिला आहे.