भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:56 IST2025-09-05T14:40:33+5:302025-09-05T14:56:06+5:30

आता भारत आणि चीन अमेरिकेला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर टॅरिफ (शुल्क) लादले आहे. आता याचा परिणामही दिसून येत आहे. टॅरिफमुळे अनेक देशांच्या व्यापारावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. आता भारत आणि चीन अमेरिकेला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन दौरा केला. त्यांनी तियानजियान येथे पार पडलेल्या एससीओ शिखर परिषदेतही भाग घेतला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन एकत्र दिसले होते.

खरेतर, भारत आणि चीन जुने वाद बाजूला सारून पुन्हा एकदा सर्व तक्रारी विसरून पुढे जात आहेत. हे दोन्ही देश अमेरिकेच्या टॅरिफला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. महत्वाचे म्हणजे, रशियाही सोबत येऊ शकतो.

दरम्यान, एससीओ शिखर परिषदेदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, यात व्यापारासाठी नवी पेमेंट सिस्टम आणण्यासंदर्भातही चर्चा झाली. भारत आणि चीन व्यापारासाठी डॉलरऐवजी एक नवी सिस्टम आणू शकतात.

'इकॉनॉमिक्स टाईम्स'च्या वृत्तानुसार, स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे प्रोफेसर मट्टेओ मॅजीओराइ (Matteo Maggiori) यांनी भू-अर्थशास्त्राच्या बदलत्या भूमिकेसंदर्भात बोलताना म्हणाले, "शक्तिशाली देश आता राजकीय प्रभाव पाडण्यासाठी, व्यापार आणि वित्तीय प्रणालींचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत. चीनचे उदाहरण देत ते म्हणाले, चीन दुर्मिळ खनिजांवर नियंत्रण ठेवतो. याच पद्धतीने अमेरिका जागतिक आर्थिक व्यवस्थेचा वापर करते.

भारत-चीन अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत - मॅजीओराइ म्हणाले, भारत आणि चीन सारखे देश आता पर्यायी पेमेंट सिस्टम तयार करत आहेत. आपला प्रभाव वाढवण्यासाठी, अमेरिकेचा दबाव कमी करण्याची या दोन्ही देशांची इच्छा आहे.

अमेरिकेला बसू शकतो झटका - अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ (कर) लादला आहे. चीनवरही कर लादण्यात आला आहे. जर भारत आणि चीनने आता डॉलर आव्हान देणारी नवी पेमेंट सिस्टम आणली, तर 'बाल्ड ईगल'ला अर्थात अमेरिकेला मोठा झटका बसू शकतो. आतापर्यंत अनेक मोठे देश व्यापारासाठी डॉलरचा वापर करत होते.