सौदी-कुवेतमध्ये PUBGवरून पेटला वाद, 'या'मुळे मुस्लिमांमध्ये पसरलीय नाराजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 09:57 PM2020-06-04T21:57:56+5:302020-06-04T22:40:14+5:30

सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये पबजी व्हिडिओ गेमच्या नव्या व्हर्जनवरून धार्मिक वाद उफाळून येत आहे. कुवेतमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, या गेमच्या नव्या व्हर्जनमध्ये 'मूर्ती पूजे'चा समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुस्लीम समाजात नाराजीचे पसरली आहे.

पबजीने 'मिस्टीरियस जंगल मोड' नावाने एक नवे व्हर्जन रिलीज केले आहे. यात खेळाडू मूर्ती पूजा करताना दिसत आहेत. यामुळे कुवेतमधील अनेक धार्म गुरूंनी पबजीच्या या नव्या व्हर्जनसंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या इस्लाम विरोधी विचारांपासून मुलांना वाचवा, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. इस्लाममध्ये मूर्ती पूजा अमान्य आहे.

मिस्टीरियस जंगल मोडमध्ये जंगली फूड, हॉट एअर बलून्ससह अनेक नवे फिचर्स अॅड करण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण वाद 'टोटेम्स'संदर्भात सुरू आहे.

या गेममध्ये टोटेम्स शक्तीशाली मूर्ती आहेत आणि यांची पूजा करून खेळाडू पुन्हा सशक्त होतो. तसेच त्याला एनर्जी ड्रिंक आणि हेल्थ किटसारख्या अनेक गोष्टी भेटतात. पबजी खेळणारे अनेक मुस्लीम या नव्या व्हर्जनला विरोध करत आहेत. एवढेच नाही, तर अनेक जण आपला राग गेममध्ये टोटेम्सला जाळून व्यक्त करत आहेत.

कुवेत विद्यापीठातील शरिया कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. बासम अल शट्टी यांनी गल्फ न्यूजसोबत बोलताना सांगितले, व्हिडिओ गेमचे अनेक चांगले आणि वाईट पैलू असू शकतात. मात्र, पबजीने तर मूर्ती पूजेच्या माध्यमातून इस्लामिक मान्यतांचेच उल्लंघन केले आहे. हे इस्लाममधील सर्वात मोठे पाप आहे. इस्लाममध्ये केवळ शक्तीशाली अल्लाहच्या प्रार्थनेतच डोके झुकवले जाते.

बेसिक एजुकेशन कॉलेजचे प्राध्यापक डॉ. राशिद अल अलीमी यांनी म्हटले आहे, की हा खेळ मुस्लिमांसाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण यांसारखे गेम, अशा पिढ्या तयार करतील, ज्यांना इस्लामचा अपमान करणाऱ्या सिद्धांतांसंदर्भात काही माहितीच असणार नाही. इस्लामचा एकेश्वरवादावर विश्वास आहे. अल्लाह हाच सृष्टी बनवणारा आणि तिचे रक्षण करणारा आहे.

डॉ. बासम म्हणाले, लाखो लोकांचा हा आवडता गेम केवळ मनोरंजनच नाही, तर अत्यंत धोकादायक आहे. कारण हा गेम अनेकेश्वरवादचे धडे देतो. छोटी मुले आणि युवक हा गेम आधी खेळतील आणि नंतर त्याच्याच आहारी जातील.

सौदी अरेबियातील इस्लामिक युनिव्हर्सिटीतील फंडामेन्टल रिलीजनचे प्राध्यापक डॉ. आरेफ बिन सुहैमी गल्फ न्यूजशी बोलताना म्हणाले, इस्लाम सहिष्णुता, संतुलन, सुधारणा, बरोबरी आणि सहमतीसारख्या गोष्टी शिकवतो. तसेच लोकांसाठी हितकारक असलेल्या सर्वच गोष्टींना प्रोत्साहित करतो. शरियामध्ये शूटिंग, स्विमिंग, हॉर्स रायडिंगसारखे गेम खेळण्याची परवानगी आहे. मात्र, असेही काही गेम्स आहेत, जे अमान्य आहेत. जसे जुगार.

प्रोफेसर सुहैमी म्हणाले, व्हिडिओ गेम्सला कायदा अथवा धर्मविरोधी गोष्टींवरून प्रतिबंध घातला जातो. कारण, इस्लाममधये मूर्ती पूजा अमान्य आहे. यामुळेच पबजी गेमचे नवे व्हर्जन वादग्रस्त आहे.

Read in English