PHOTOS: अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये 'इयान' चक्रीवादळाने घातला हाहाकार, पाहा भयानक दृश्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:29 PM2022-09-30T12:29:01+5:302022-09-30T12:37:22+5:30

अमेरिकेच्या धरतीवर इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयानक चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळामुळे मोठी जीवितहानी झाली आहे मात्र अद्याप मृतांचा आकडा समोर आलेला नाही. लक्षणीय बाब म्हणजे 'इयान' हे चक्रीवादळ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे वादळ आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, इयान चक्रीवादळातील मृतांचा आकडा अद्याप समोर आला नाही. पण मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे, अशी माहिती आहे. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस म्हणाले की, येत्या काही दिवसांत जीवितहानीबाबत ठोस माहिती मिळण्याची शक्यता आहे.

'फोर्ट मायर्स'ला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे रस्ते आणि नाल्यांना नद्यांचे स्वरूप आले असून समुद्राचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. फोर्ट मायर्समधील घरांची झालेली अवस्था या फोटोमध्ये पाहिली जाऊ शकते. अमेरिकेच्या धरतीवर धडकलेल्या या 'इयान' चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे.

गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी या वादळाचा वेग ताशी 241 किलोमीटर इतका होता, या अतिवेगामुळे शहरातील झाडे जमीनदोस्त होत आहेत. तसेच फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसॅंटिस यांनी राज्याच्या नैऋत्य भागात झालेल्या विनाशाचे वर्णन करताना 500 वर्षांत झालेली ही सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले. खरं तर असे वादळ आजवर कधीच पाहिले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसॅंटिस यांच्या माहितीनुसार, फ्लोरिडाची धरती पाण्याखाली गेली असून यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला जात आहे. एएफपीशी संवाद साधताना अमेरिकेच्या कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हेलिकॉप्टरचे कर्मचारी पूरग्रस्त घरांच्या छतावरून लोकांना बाहेर काढत आहेत.

बुधवारी या मोठ्या वादळात बुडलेल्या एका जहाजातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. लक्षणीय बाब म्हणजे यामधील एकूण 18 प्रवासी बेपत्ता आहेत. त्यापैकी चार क्यूबन होते जे पोहत किनाऱ्यावर आले होते.

या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठी जीवितहानी होत आहे. येथील 20 लाखांहून अधिक घरे वीजेअभावी अंधारात गेली आहेत. हे भयानक वादळ अमेरिकेतील आतापर्यंतच्या सर्व वादळांपैकी सर्वात धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

इयान चक्रीवादळाच्या तांडवामुळे फ्लोरिडा येथील अनेक भागांतील लोकांना स्थलांतराचे आदेश जारी करण्यात आले होते. यामधील अनेक लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. तर उर्वरीत लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.