लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 17:07 IST2026-04-12T17:02:44+5:302026-04-12T17:07:16+5:30

अमेरिकेने अनेक वर्षांपासून इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तरीही इराण जर इतकी मिसाइल बनवत असेल तर त्याला हा पैसा कुठून मिळतो? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण याचे उत्तर आहे तेल विक्री..इराण हा पैसा कोणत्या बँकेत ठेवतो आणि निर्बंधांमुळे व्यवहार करणे कठीण झाल्याने तो त्याचा वापर कसा करतो? हादेखील प्रश्न आहे.

आता या प्रश्नाचे उत्तर चीनला लागून असलेल्या एका लहान देशात दडलेले आहे. हा देश आहे हाँगकाँग, जो इराणच्या शॅडो बँकिंग सिस्टमचं महत्त्वाचं केंद्र बनले आहे. इथून बेकायदेशीरपणे तेलातून कमावलेले अब्जावधी डॉलर्स आणि निर्बंध लादलेले लष्करी तंत्रज्ञानाची खरेदी-विक्री सुलभ करता येते. हाँगकाँग अनेक मार्गांनी हे गुप्त आर्थिक जाळे चालवण्यास मदत करते.

वॉल स्ट्रीट जर्नल आणि इतर रिपोर्टमधून या लहानशा देशात मनी लॉन्ड्रिंग कसं चालतं हे उघड झाले आहे. याठिकाणी शेल कंपन्यांचे मोठे नेटवर्क आहे. हाँगकाँगमध्ये कंपन्या स्थापन करणे सोपे आहे त्यामुळे निर्बंधांना सामोरे जाणारे लोक आपले खरे व्यवहार लपवण्यासाठी तिथे असंख्य बनावट कंपन्या तयार करतात.

येथील या शेल कंपन्यांनी इराणच्या शॅडो बँकिंग सिस्टमशी संबंधित अंदाजे ४.८ अब्ज डॉलर्सचे व्यवहार हाताळले जे संयुक्त अरब अमिरातीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपन्या तेल विक्रीतून मिळवलेल्या चीनी युआनचे डॉलर्स, युरो किंवा इतर परकीय चलनांमध्ये रूपांतर करतात ज्यामुळे इराणला आंतरराष्ट्रीय व्यापार करणे शक्य होते.

इतकेच नाही तर फिनसेनच्या मते, इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाश्चात्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि रॉकेट इंधन खरेदी करण्यासाठीही हाँगकाँग कंपन्यांचा वापर केला गेला आहे. अमेरिकेच्या निर्बंधांना टाळण्यासाठी इराणशी संबंधित व्यवहार मोठ्या आंतरराष्ट्रीय बँकांमार्फत न करता लहान प्रादेशिक बँकांमार्फत केले जातात.

म्हणजेच बँक ऑफ कुनलुन, जी प्रामुख्याने युआनमध्ये व्यवहार करते आणि डॉलर सिस्टमपासून दूर राहते. याव्यतिरिक्त बँक तेजरतशी संबंधित एक्सचेंज हाऊसेस हाँगकाँगमधील अनेक शेल कंपन्यांवर नियंत्रण ठेवतात, ज्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्ससाठी फंडचे मॅनेजमेंट करतात.

हाँगकाँग सरकार अमेरिकेसारख्या देशांनी लादलेले एकतर्फी निर्बंध मान्य करत नाही. हे शहर केवळ संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध लागू करते असं हाँगकाँगचे पंतप्रधान जॉन ली यांनी म्हटले आहे. यामुळे अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जाणाऱ्या कंपन्यांना तिथे सहजपणे काम करता येते. अमेरिका सतत नवीन कंपन्यांवर निर्बंध लादत असली तरी त्यांची जागा घेण्यासाठी लगेचच नवीन शेल कंपन्या तयार केल्या जातात.

शिपिंग आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट - हाँगकाँग हे इराणच्या छुप्या टँकर जहाजांच्या ताफ्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथील शिपिंग कंपन्या समुद्रात एका जहाजातून दुसऱ्या जहाजात तेल हस्तांतरित करतात आणि त्याचा खरा सोर्स लपवतात. इतकेच नाही तर बनावट नोटा आणि खोट्या लेबल्सचा वापर करून ते प्रतिबंधित संसाधने आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवतात.

इराणी पैशांसाठी हाँगकाँग बनला आश्रयस्थान - हाँगकाँग हे एक असे आर्थिक केंद्र आहे जिथे इराणशी संबंधित लोक शेल कंपन्यांमार्फत पैसे पाठवतात आणि स्वीकारतात. यामुळे पैशाचा खरा सोर्स लपवला जातो आणि निर्बंधांना टाळता येते. यामुळेच इराणी पैसा इथं गुंतवण्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत.

कंपन्या लवकर तयार होतात आणि स्थानिक सरकार अमेरिकेच्या निर्बंधांची अंमलबजावणी करत नाही, त्यामुळे देखरेख कमकुवत असते. इराणचा बहुतांश पैसा तेल विक्री आणि व्यापारातून येतो, जो नंतर सरकारी उपक्रम आणि खरेदीसाठी निधी पुरवण्यासाठी शॅडो बँकिंग आणि ऑफशोर खात्यांमार्फत वळवला जातो.