बाप रे! इराणसोबतच्या युद्धासाठी अमेरिका मोजणार १,८८,७०,००,००,००,००० रुपये; ट्रम्प म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:13 IST2026-03-04T13:04:17+5:302026-03-04T13:13:57+5:30

इराणसोबत सुरू झालेल्या या संघर्षात अमेरिकेला प्रचंड मोठी आर्थिक किंमत मोजावी लागत आहे.

मध्यपूर्वेतील रणसंग्राम आता केवळ क्षेपणास्त्रांपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो जगातील सर्वात महागड्या युद्धांपैकी एक ठरत आहे. इराणसोबत सुरू झालेल्या या संघर्षात अमेरिकेला प्रचंड मोठी आर्थिक किंमत मोजावी लागत आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, या युद्धाचा एकूण खर्च तब्बल १८.८७ लाख कोटी रुपयांपर्यंत (२१० अब्ज डॉलर) पोहोचण्याचा अंदाज आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध किमान एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालेल, असे संकेत दिले आहेत.

रिपोर्टनुसार, इराणवर हल्ला सुरू झाल्याच्या पहिल्या २४ तासांतच अमेरिकेने ७७९ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ६,९०० कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्षेपणास्त्रे, इंधन आणि लष्करी हालचालींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष युद्धापूर्वीच केवळ तयारीसाठी अमेरिकेला ५,५५६ कोटी रुपये खर्च करावे लागले होते.

अमेरिकेने इराणच्या नाकेबंदीसाठी जगातील सर्वात मोठी विमानवाहू नौका 'USS गेराल्ड आर फोर्ड'सह दोन 'कॅरियर स्ट्राइक ग्रुप' तैनात केले आहेत. 'सेंटर फॉर न्यू अमेरिकन सिक्योरिटी'च्या आकडेवारीनुसार, अशा एका स्ट्राइक ग्रुपच्या संचालनासाठी दररोज ५८ कोटी रुपये खर्च होतात. दोन गट तैनात असल्याने हा आकडा सव्वाशे कोटींच्या घरात जातो.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर, अमेरिकेने आतापर्यंत इस्रायलला २१.७ अब्ज डॉलरची लष्करी मदत दिली आहे. येमेन, इराण आणि मध्यपूर्वेतील इतर मोहिमांचा खर्च जोडला, तर हा आकडा ३ लाख कोटी रुपयांच्या पार जातो. 'पेन व्हार्टन बजेट मॉडेल'चे संचालक केंट स्मेटर्स यांच्या मते, जर हे युद्ध ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे लांबले, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर १८.८७ लाख कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाच्या कालावधीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी अत्यंत कठोर भूमिका मांडली. ट्रम्प म्हणाले, "आम्ही सुरुवातीला ४ ते ५ आठवड्यांचा अंदाज वर्तवला होता, पण आमच्याकडे त्यापेक्षा जास्त काळ युद्ध लढण्याची क्षमता आहे. मग कितीही वेळ लागो किंवा काहीही करावे लागो, आम्ही मागे हटणार नाही."

ट्रम्प यांच्या या विधानामुळे हे स्पष्ट झाले आहे की, अमेरिका आता इराणसोबतचे युद्ध आणखी तीव्र करणार आहे. मग त्यासाठी कितीही मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली तरी त्याची तयारी अमेरिकेने केली आहे.