Visa चे नियम बदलले; जाणून घ्या आता Dubai ला जाणं सोपं होणार की कठीण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:13 PM2022-10-04T12:13:02+5:302022-10-04T12:34:09+5:30

Dubai Visa Rules: तुम्ही दुबईला जाण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दुबईच्या व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) व्हिसाचे नियमांमध्ये बदल केले आहेत. जे लोक दुबईमध्ये दीर्घकाळ राहण्याचा विचार करत आहेत आणि तेथे काम करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

जर तुम्हीही दुबईमध्ये राहण्याचा विचार करत असाल, तर व्हिसाच्या नियमांमध्ये काय बदल झाले आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. वास्तविक, आता यूएईने अनेक नियम शिथिल केले आहेत, त्यानंतर दुबईला जाणे सहज शक्य आहे.

अशा परिस्थितीत दुबईने किती प्रकारचे व्हिसा दिले आहेत आणि व्हिसाच्या नियमांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले आहेत हे आपण जाणून घेऊ. यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या प्लॅननुसार कोणते नियम बदलले आहेत.

संयुक्त अरब अमिरातीकडून गोल्डन व्हिसा, ग्रीन रेसिडेन्सी व्हिसा आणि टुरिस्ट व्हिसा दिला जातो. गोल्डन व्हिसा अशा लोकांसाठी आहे ज्यांना दुबईमध्ये दीर्घकाळ राहायचे आहे किंवा स्थायिक व्हायचे आहे. हा व्हिसा दहा वर्षांसाठी आहे.

याशिवाय ग्रीन रेसिडेन्सी व्हिसा अशा लोकांसाठी आहे जे काही वर्षांसाठी नोकरीसाठी दुबईला जातात. हा व्हिसा 5 वर्षांसाठी वैध आहे. यासोबतच विझटर्ससाठीही एक व्हिसा आहे ज्याचा कालावधी 90 दिवसांचा आहे.

सोप्या भाषेत समजून घ्यायचं झआलं तर या व्हिसा नियमांमुळे त्या लोकांना फायदा होईल जे दीर्घकाळासाठी तिकडे राहयला जाणार आहेत. ज्या लोकांना नोकरीच्या निमित्तानं तिकडे जायचं असेल त्यांच्यासाठीही हा नियम दिलासादायक आहे. युएईनं व्हिसासाठीच्या अनेक नियमांना शिथिल केलं आहे.

आता पाच वर्षांच्या ग्रीन व्हिसासाठी एम्प्लॉयरची मदत घ्यावी लागणार नाही. आता विशिष्ट व्यक्तीला थेट व्हिसा देता येणार आहे. यासोबतच ग्रीन व्हिसाधारक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्पॉन्सर करू शकतात. जर ग्रीन व्हिसा धारकाचं परमिट पूर्ण झालं असेल, तर त्याला त्याचे नूतनीकरण करण्यासाठी 6 महिन्यांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल.

याशिवाय गोल्डन व्हिसाशी निगडीत नियमांमध्येही सूट देण्यात आली आहे. याचा गुंतवणूकदार, व्यावसायिकांना फायदा होणार आहे. गोल्डन व्हिसाधारक आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मुलांना स्पॉन्सर करू शकतील. तसंच गोल्डन व्हिसाधारकाचा मृत्यू झाला तरी त्याचे कुटुंबीय व्हिसाची मुदत पूर्ण होईपर्यंत संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहू शकतील.

ज्यांच्याकडे टुरिस्ट व्हिसा असेल ते 60 दिवसांसाठी युएईमध्ये राहू शकतील. यासोबत ज्यांना तिकडे नोकरीसाठी जायचं आहे त्यांना 90 दिवसांचा व्हिसा देण्यात येईल. त्यांना या व्हिसावर नोकरीही शोधता येणार आहे. यासाठी आता पहिले नोकरी मिळवून नंतर कोणत्याही कंपनीत जाण्याची गरज नाही. नोकरीपूर्वीच तुम्ही तिकडे जाऊन जॉब शोधू शकता.