आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:58 IST2025-09-27T12:53:06+5:302025-09-27T12:58:36+5:30

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अचानक एक सीक्रेट बैठक बोलावली आहे ज्यामध्ये नौदल, हवाई दल आणि लष्करातील ८०० हून अधिक जनरलना आमंत्रित करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार मागील काही दिवसांपासून या बैठकीची तयारी सुरू आहे. ज्यात शेकडो वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
NBC न्यूजनुसार, या बैठकीच्या तयारीत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बैठकीचं प्लॅनिंग, त्याची वेळ याला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. परंतु हे सगळे अचानक झालं की, जनरल, सैन्य अधिकाऱ्यांना बैठकीत आणण्यासाठी फ्लाईट शोधणे आणि अन्य तयारी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
अचानक बोलवलेल्या या बैठकीमुळे सैन्य अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. कारण इतक्या मोठ्या संख्येने वरिष्ठ अधिकाऱ्यांना वॉश्गिंटनला बोलवणे ना कुठला योगायोग आहे ना या बैठकीमागील अजेंडा स्पष्ट आहे. अधिकाऱ्यांना केवळ बैठकीची तारीख आणि ठिकाणाबाबत कळवले आहे. त्यातील अजेंडा नाही.
विशेष म्हणजे, पेंटागन आणि अमेरिकन संसदेलाही या बैठकीतील अजेंड्याबाबत माहिती नाही. त्यामुळे अमेरिकन संरक्षण मंत्रालयात या बैठकीला घेऊन अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही जण दबक्या आवाजात अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करू शकतं असेही बोलत आहे.
अनेक रिपोर्टमध्ये म्हटलंय की, अमेरिकन सैन्य अधिकारी व्हेनेझुएलातील अंमली पदार्थ तस्करांना लक्ष्य करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे. त्याच योजनेतून अमेरिकन सैन्य व्हेनेझुएला येथे काही आठवड्यात अनेक ठिकाणांवर हल्ला करू शकते.
एनबीसी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने अद्याप अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठल्याही कारवाईला मंजुरी दिली नाही आणि अमेरिका- व्हेनेझुएला यांच्यात मध्यस्थांमार्फत संवाद सुरू असल्याचे सांगत आहे. परंतु अमेरिकन संरक्षण सचिवांनी व्हेनेझुएलावर हल्ला करण्यासाठीच ८०० सैन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या चर्चेने सस्पेन्स कायम आहे.
ही बैठक वॉशिंग्टनपासून सुमारे दीड किमी अंतरावर असलेल्या व्हर्जिनियामधील क्वांटिको मरीन कॉर्प्स बेसवर हे होणार आहे. सामान्य परिस्थितीत संरक्षण मंत्री त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी छोट्या बैठका किंवा व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतात. पण यावेळी संरक्षण सचिव हेगसेथ यांनी शेकडो जनरल आणि अॅडमिरलना एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत
शिवाय या अधिकाऱ्यांसोबत त्यांचे सहाय्यक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी असतील ज्यामुळे खरी संख्या ३,००० पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. इतक्या अचानक मोठ्या हालचालीमुळे केवळ खर्च आणि सुरक्षेच्या चिंताच निर्माण झाल्या नाहीत तर जगाच्या विविध भागांमधून इतके वरिष्ठ लष्करी अधिकारी अमेरिकेत येत असल्याने आणि त्यांच्या कमांडपासून दूर राहिल्याने ऑपरेशन्सवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता देखील निर्माण झाली आहे.
काही रिपोर्टमध्ये या बैठकीत नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटर्जीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामध्ये चीन, रशिया, इराण आणि दहशतवादाच्या धोक्यांपेक्षा देशातंर्गत संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल. जर असं झालं तर याचा अर्थ जियो पॉलिटिक्समध्ये काहीतरी वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
संरक्षण सचिव हेगसेथ यांनी अलीकडेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेषतः महिला आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांना अचानक काढून टाकले. २०% पर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कमी करण्याच्या योजनेचीही चर्चा आहे. परिणामी क्वांटिको बैठकीत मोठ्या प्रमाणात कपातीची घोषणा होऊ शकते अशी भीती लष्करी अधिकाऱ्यांमध्ये वाढत आहे.