कोरोनाबाधित डोनाल्ड ट्रम्प यांना दिलं जाणारं औषध सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही

By ravalnath.patil | Published: October 4, 2020 08:05 AM2020-10-04T08:05:00+5:302020-10-04T08:33:35+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत अशी माहिती समोर येत आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रुग्णालयात खास अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेलपासून उपचार करण्यात येत आहे. मात्र, असे उपचार अद्याप सामान्य लोकांना उपलब्ध नसल्याचे म्हटले जात आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांना उंदरापासून तयार केलेले अँटीबॉडी देण्यात आले आहेत. हे औषध सामान्यतः वापरले जात नाही आणि सामान्य लोकांसाठी उपलब्ध नाही आहे.

उंदारापासून तयार केलेली अँटीबॉडीज अमेरिकन कंपनी Regeneron ने तयार केली आहेत. याचा वापर ब्रिटनमध्ये चाचणी म्हणूनही केला जात आहे. ऑक्सफोर्डच्या प्राध्यापकाने या औषधाचे फार चांगले परिणाम असल्याचे सांगितलेआहे. या औषधाचे नाव REGN-COV2 असे ठेवण्यात आले आहे.

REGN-COV2 सोबत डोनाल्ड ट्रम्प यांना Remdesivir हे औषध देखील दिले जात आहे. यासह झिंक, व्हिटॅमिन डी, एस्पिरिन, Famotidine आणि Melatonin ही औषधेही दिली जात आहेत.

REGN-COV2 औषधाची चाचणी अद्याप सुरू आहे, परंतु सुरुवातीच्या माहितीनुसार असे दिसून आले होते की, कोरोनाचे रुग्ण जे रुग्णालयात दाखल नाहीत, त्या रुग्णांमध्ये या औषधामुळे व्हायरल लोड कमी झाला आहे. म्हणजेच शरीरातील व्हायरसचे प्रमाण कमी झाले आहे.

REGN-COV2 औषध कोरोना रुग्णांचा रिकव्हरीचा वेळ कमी करू शकते. हे औषध उंदीर आणि कोरोनापासून बरे झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या अँन्टीबॉडीज मिसळून तयार केले गेले आहे. हे औषध कोरोना व्हायरसचा न्यूट्रलाइड कमी करून काम करते. मात्र, चाचणी दरम्यान दोन रुग्णांना या औषधाचे दुष्परिणाम झाले होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाईन झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी याची माहिती देत उपचार सुरु केल्याचे म्हटले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचे काल हेल्थ बुलेटीन जारी केले आहे. अध्यक्ष ट्रम्प हे उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या असून काळजीचे कुठलेही कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक डिबेट दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडन यांच्यावर टीका करताना गरज भासली तरच मास्क घालेन, असे सांगितले होते. तसेच अनेकदा त्यांनी जाहीररित्या मास्क घालणार नाही, असे म्हटले होते.