Devendra Fadanvis: 'लोकशाहीर अण्णाभाऊ हे विद्यापीठ होते', रशियात पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 07:10 PM2022-09-14T19:10:17+5:302022-09-14T19:44:52+5:30

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज रशियात अण्णाभाऊ साठेंच्या तैलचित्राचे आणि पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी, मोठा उत्साह मराठीजनांच्या चेहऱ्यावर दिसून आला. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची महती सांगितली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज रशियात अण्णाभाऊ साठेंच्या तैलचित्राचे आणि पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी, मोठा उत्साह मराठीजनांच्या चेहऱ्यावर दिसून आला. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची महती सांगितली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक विद्यापीठ होते. आज याठिकाणी त्यांच्या स्मृति उभ्या राहत आहेत, हा त्यांचा मोठा गौरव आहे. प्रत्येक मराठीजनाचा, महाराष्ट्रीयन माणसाचा सुद्धा हा गौरव आहे. आपल्या लाडक्या नेत्याचे स्मारक रशियात लोकार्पित झाले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा! वंचित, श्रमिकांचा आवाज आज रशियात बुलंद झाला. साहित्यभूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे आज मॉस्कोमध्ये लोकार्पण केले. माझ्याही आयुष्यातील संस्मरणीय क्षण!, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे,माझे अन्य सहकारी आ. सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे,माजी आ. सुधाकर भालेराव,अमित गोरखे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

समाजसुधारक, कवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनावर रशियन क्रांतीचा मोठा प्रभाव होता. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता आणि रशियातील लेनिनच्या नेतृत्वाखालील कामगार क्रांतीमुळे ते भारावून गेले.

अण्णाभाऊंच्या साहित्यांमध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा, रशियाचा माझा प्रवास आणि अनेक कथा आणि कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या आहेत. त्यामुळे, रशियातही अण्णांच्या साहित्याची आणि व्यक्तीमत्वाची मोठी छाप आहे.

मुंबई विद्यापीठाच्या युरेशियन स्टडीज विभागांतर्गत भारत-रशिया राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रशियामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही परिषद 14 आणि 15 सप्टेंबर रोजी मॉस्को येथील रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी येथे होत आहे. भारतातील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेसह (ICCR) मुंबई विद्यापीठाने या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

इंडियन कौन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्च (ICHR) चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे म्हणाले, "आज मॉस्कोमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल प्रेम आणि आदर असलेल्या लोकांचा एक वर्ग आहे आणि रशियामध्ये त्यांच्या प्रतिमेचे उद्घाटन होत आहे, ही एक सन्मानाची गोष्ट आहे."

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती शेअर केली आहे. तसेच, पुतळा अनावरणाचे फोटोही शेअर केले आहेत.