Corona Virus : कोरोनाचा हाहाकार! चीनला 6.5 कोटी रुग्ण सापडण्याची भीती; भारतालाही धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 01:57 PM2023-05-29T13:57:55+5:302023-05-29T14:12:14+5:30

Corona Virus : पुढील महिन्यात चीनमध्ये दर आठवड्याला 6.5 कोटी लोकांना कोरोना व्हायरसची लागण होईल असा अंदाज आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या नवीन XBB व्हेरिएंटला सामोरे जाण्यासाठी चीनने तयारी सुरू केली आहे. जून महिन्यात देशात कोरोनाचे 6.5 कोटी रुग्ण समोर येऊ शकतात, असा अंदाज आहे. कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चीनी महामारीशास्त्रज्ञांनी आग्रह धरला आहे की देशाने रुग्णालयांना व्हायरसविरोधी औषधांचा पुरवठा करण्यास तयार असले पाहिजे. वृत्तानुसार, चीनच्या आर्थिक विकासावर परिणाम होऊ नये म्हणून शी जिनपिंग सरकार लॉकडाऊन टाळणार आहे. चीनी तज्ञांनी भारताला नवीन संसर्गाच्या लाटेबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.

पुढील महिन्यात चीनमध्ये दर आठवड्याला 6.5 कोटी लोकांना कोरोना व्हायरसची लागण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे देशात कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. XBB व्हेरिएंट चीनमध्ये अत्यंत वेगाने वाढत आहे.

अवघ्या 6 महिन्यांपूर्वी, चिनी अधिकाऱ्यांनी अत्यंत क्रूर 'झिरो कोविड' धोरण संपवलं आहे. झिरो कोविड धोरणामुळे देशात लॉकडाऊन, लोकांच्या हालचालींवर निर्बंध आणि इतर अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध होते.

XBB हा Omicron व्हेरिएंटचा सब-व्हेरिएंट आहे. ऑगस्ट 2022 मध्ये भारतात पहिल्यांदा त्यांची ओळख झाली. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की XBB हे आतापर्यंतच्या सर्वात संसर्गजन्य व्हेरिएंटपैकी एक आहे जो इम्यून सिस्टमला मात देतो.

27 मे रोजी चीनी महामारीशास्त्रज्ञ, झोंग नानशान यांनी इशारा दिला की एप्रिलच्या शेवटच्या दिवसातच नवीन व्हेरिएंटची लाट सुरू झाली आहे. नानशान म्हणाले, 'चीन दर आठवड्याला 4 कोटी प्रकरणांकडे जात आहे.'

कोरोनाचा कहर रोखण्यासाठी आपली लस अत्यंत प्रभावी असल्याचा दावा चीनने यापूर्वी केला होता, मात्र आता त्यांची पोलखोल झाली आहे. चीनने दोन लसींना मंजुरी दिली आहे, परंतु या दोन्ही लसी कोरोनाचा कहर रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत.

चीन आता आणखी 3 ते 4 लसींना मान्यता देणार आहे. चीनच्या आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट झपाट्याने पसरेल आणि त्याचा विस्तार आशियातील भारत ते अमेरिका आणि युरोपपर्यंत या वर्षासाठी चिंतेचा विषय असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना आता मेडिकल इमर्जन्सी नसल्याचं म्हटलं आहे. पण असं असताना देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर चार मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कोरोना कमकुवत लोक आणि कमी लसीकरण असलेल्या देशांना लक्ष्य करत आहे. गेल्या वर्षी हृदयविकार आणि कॅन्सरनंतर अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्यापही आवश्यक लसीकरण आणि मास्क वापरण्याकडे लक्ष दिले जात नाही.