CoronaVirus Updates: भय इथले संपत नाही! डेल्टा व्हेरिंएट ठरणार पुढच्या लाटेचं कारण; WHOकडून भीती व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 01:29 PM2021-07-31T13:29:14+5:302021-07-31T13:50:13+5:30

CoronaVirus Updates: कोरोनाने सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

कोरोनाने सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे.

संशोधनातून आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक असून कांजण्यांप्रमाणे वेगाने संसर्ग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे संक्रमणाचा वेग अधिक पटीने वाढला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार, जो आधीच भारतात सापडला आहे, आता १३२ देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचे आरोग्य संघटनेनं सांगितलं.

डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. “डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक इशारा आहे की हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटलं आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या भारतातील तिसऱ्या लाटेचे कारण बनत असताना, डेल्टा प्रकार जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचे कारण बनत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोनाच्या डेल्टा प्रकाराने मध्य-पूर्व देशांमध्ये चौथ्या लाटेचे स्वरूप घेतले आहे आणि करोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे.

डेल्टाने अनेक देशांना हादरवून टाकले असले तरी, त्याचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी उपाय अजूनही आहेत. विशेषतः सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो. “व्हायरस फिटर झाला आहे, व्हायरस वेगाने वाढच आहे.

कोरोना रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करत आहे, पण आपल्याला आधीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार, डेल्टा व्हायरसचा संसर्ग नाक आणि घशावाटे होतो. लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले लोकं सारख्याच प्रमाणात या व्हायरसचा प्रसार करू शकतात. पण प्रत्येक वेळी असंच घडेल, हे मात्र नक्की नाही. डेल्टा व्हेरिएंट हा मर्स, सार्स, इबोला, सर्दी, फ्लू सारखा वेगानं पसरतो. हा व्हायरस कांजण्यांसारखाच संसर्गजन्य असल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सनेही दिलं आहे.