CoronaVirus : मोठा दिलासा! Omicronला घाबरायचं कारण नाही, हाच व्हेरिअंट करेल कोरोनाचा संपूर्ण खात्मा; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 10:44 PM2021-12-31T22:44:48+5:302021-12-31T22:55:29+5:30

ब्रिटीश मेडिकल काउंसिलचे माजी वैज्ञानिक डॉ. राम एस. उपाध्याय यांनी ओमाक्रॉनसंदर्भात दिलासादायक माहिती दिली आहे.

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिअंट संपूर्ण जगात वेगाने पसरत चालला आहे. मात्र, हाच व्हेरिअंट कोरोनाच्या खात्म्याचे कारण बनेल. ओमायक्रॉनच्या वेगाने होणाऱ्या फैलावास घाबरायची गरज नाही. या व्हेरिअंटमुळेच ही महामारी संपुष्टात येईल, असे ब्रिटिश मेडिकल कउन्सिलच्या एका माजी वैज्ञानिकाने म्हटले आहे.

डेल्टाच्या तुलनेत कमी घातक - महत्वाचे म्हणजे, कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट हा फुफ्फुसांवर हल्ला करतो, तसे ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये दिसत नाही. ओमायक्रॉन व्हेरिअंट हा अत्यंत हळुवारपणे पसरतो आणि त्याचा संसर्ग झालेल्यांनाही फारशा समस्यांचा सामना करावा लागत नाही. मात्र, गुरुवारीच युरोप आणि अमेरिकेत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसली.

फुफ्फुसात पोहोचल्यानंतर 10 पट कमी होते ओमायक्रॉनची स्पीड - ब्रिटीश मेडिकल काउंसिलचे माजी वैज्ञानिक डॉ. राम एस. उपाध्याय यांनी ओमाक्रॉनसंदर्भात दिलासादायक माहिती दिली आहे. डॉ उपाध्याय यांच्या मते, ओमायक्रॉन श्वासनलिकेमध्ये थांबून आपली संख्या वाढवतो. पण फुफ्फुसात पोहोचल्यानंतर त्याची स्पीड 10 पट कमी होते. यामुळे रुग्णाला ऑक्सिजन सपोर्टची गरज पडत नाही.

मानवाच्या श्वासनलीकेत ‘म्यूकोसल इम्यून सिस्टम’ असते, हे इम्युनिटी सिस्टिमचे सेंटर असते. येथेच एक अँटीबॉडी तयार होते. यालाच ‘इम्युनोग्लोबुलिन आयजीए’ म्हटले जाते. यामुळे ओमायक्रॉन जेव्हा श्वासनलीकेत आपली संख्या वाढवतो, तेव्हा येथे आधिपासूनच असलेल्या अँटीबॉडी लवकर अॅक्टिव्ह होतात. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास ओमायक्रॉनचा धोका वाढण्यापूर्वीच अँटीबॉडी त्याचा खात्मा करायला सुरुवात करते.

ओमायक्रॉन करेल कोरोनाचा खात्मा - जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोरोनाच्या कोणत्याही व्हेरिअंटचा संसर्ग होतो, तेव्हा त्याचे शरीर रिकव्हर होताना नैसर्गिकपणे अंटीबॉडी तयार करते. लसही साधारणपणे असेच काम करते. कोरोनाशी लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणे हे लसीचे काम असेत. ओमिक्रॉन अत्यंत हळू पसरतो, तो जेवढ्या लोकांत पसरेल तेवढ्या अधिक लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार होईल.

अँटीबॉडी बनविण्यासाठी ओमायक्रॉन चांगला - हे लक्षात घेण्यासारखे आहे की, संसर्गामुळे निर्माण झालेली रोग प्रतिकारशक्ती ही लसीने निर्माण केलेल्या प्रतिकारशक्तीपेक्षा अधिक काळ शरीरात राहते. यामुळे, तो जेवढ्या वेगाने लोकांना संक्रमित करेल, तेवढाच त्याचा धोका कमी होईल.

धोका कसा कमी होईल, हे आपण डेल्टाशी तुलना करूनही समजू शकतो. जेव्हा डेल्टा व्हेरिअंट पसरला, तेव्हा जगात अनेकांचा मृत्यू झाला. परंतु ओमायक्रॉनच्या बाबतीत, मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे. कारण हा प्रकार शरीराला कमकुवत बनवण्याऐवजी मजबूत बनवण्याचे काम करतो. या आधारेच, हा व्हेरिअंटच कोरोना महामारीच्या खात्म्याचे कारण बनेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.