coronavirus :...म्हणून प्रत्येक देशात वेगळे आहे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 04:39 PM2020-03-31T16:39:51+5:302020-03-31T16:46:22+5:30

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश आजच्या घडीला कोरोना विषाणूविरोधात लढत आहेत.

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश आजच्या घडीला कोरोना विषाणूविरोधात लढत आहेत. बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. काही देशात मृत्यूचे थैमान सुरू आहे. मात्र बारकाईने पाहिल्यास विविध देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण वेगवेगळे दिसून येत आहे. आज आपण जाणून घेऊया. प्रत्येक देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वेगवेगळे असण्याची कारणे.

जगातील प्रत्येक कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या चाचणींचे प्रमाण वेगवेगळे आहे. त्यामुळे काही देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची चाचणी झाली नसेल तर अशांचा समावेश कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या यादीत केला जात नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव मृत्यू दरावर दिसून येतो.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर त्या त्या देशातील लोकसंख्येचा पिरॅमिड प्रभाव टाकत असतो. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना दिसून आला आहे. त्यामुळे ज्या देशात ज्येष्ठ। नागरिक अधिक आहेत आणि ते विविध व्याधींनी ग्रस्थ आहेत आशा देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा या साथीच्या वेळेवर अवलंबून असतो. ज्या देशात कोरोनाची नुकतीच सुरुवात झाली आहे. अशा देशांपेक्षा जिथे साथ येऊन अनेक दिवस झाले असतील तिथे मृत्यूंचे प्रमाण अधिक दिसून येते.

आरोग्य सेवा हा कुठल्याही देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. तसेच संबंधित देशाची आरोग्य व्यवस्था कोरोनासारख्या साथीचा संसर्ग रोखण्यासाठी सक्षम आहे का? यावर त्या त्या देशातील मृत्युदर अवलंबून असतो. कोरोनासारख्या आजारात श्वासोच्छ्वास करण्यास अडचणी येतात अशावेळी व्हेंटिलेटरची उपलब्धता निर्णायक ठरते.

प्रत्येक देशात इंटेंसिव्ह केअर बेड उपलब्धता वेगवेगळी आहे. अमेरिकेत प्रत्येकी एक लाख लोकांमागे 34 इंटेंसिव्ह केअर बेड आहेत. तर इटलीत प्रत्येकी लाख लोकांमागे केवळ 12 इंटेंसिव्ह केअर बेड आहेत. इंटेंसिव्ह केअर बेड जेवढे जास्त तेवढे अधिकाधिक रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. मात्र दक्षिण कोरियाने कमी प्रमाणात इंटेंसिव्ह केअर बेड असूनही क्वारंटिनबाबत कडक नियम करून कोरोनावर नियंत्रण मिळवले.

कोरोना विषाणूच्या संसर्गास चीनमधून सुरुवात झाली असली तरी आजच्या घडीला कोरोनामुळे सर्वाधिक बळी इटली आणि स्पेनमध्ये गेले आहेत. इटलीत आतापर्यंत 11 हजार 591 तर स्पेनमध्ये 7 हजार 800 हून अधिक लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत.