coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 07:57 IST2020-07-17T07:50:34+5:302020-07-17T07:57:59+5:30
कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन रुग्णसेवेत गुंतले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही डॉक्टर मात्र आपल्या पेशाचा गैरफायदा घेऊन नफा कमवण्यात गुंतले आहेत.

कोरोना विषाणूमुळे सध्या जगभरात थैमान घातलेले आहे. काही देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन रुग्णसेवेत गुंतले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही डॉक्टर मात्र आपल्या पेशाचा गैरफायदा घेऊन नफा कमवण्यात गुंतले आहेत.

असाच एक धक्कादायक प्रकार बांगलादेशमध्ये उघड झाला आहे. बांगलादेशमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच एका डॉक्टरने कोरोनाचा सामना करत असलेल्या लोकांनाच आपल्या कमाईचे माध्यम बनवले. त्याने हजारो लोकांना कोरोनाचे खोटे रिपोर्ट देऊन गंडा घातला.

एकीकडे कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टर हे हजारो रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. तर या डॉक्टरने मात्र हजारो लोकांच्या जीवाशी खेळ केला.

मोहम्मद शाहेद असे या डॉक्टरचे नाव असून, ढाका येथील रुग्णालय आणि लॅबच्या माध्यमातून त्याने हा काळा धंदा केला.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृ्त्तानुसार डॉक्टर शाहेदच्या रुग्णालयात एकूण चाचणीसाठी एकूण दहा हजार ५०० रिपोर्ट आले होते. यापैकी केवळ ४२०० अहवालांची चाचणी करण्यात आली होती. तर सहा हजार ३०० अहवालांची चाचणीच करण्यात आली नाही. हे सर्व अहवाल चाचणी न करताच निगेटिव्ह म्हणून देण्यात आले.

दरम्यान, या रिपोर्टसाठी डॉक्टर शाहेदने रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते. दरम्यान, सरकारी लॅबमध्ये जेव्हा या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हा डॉक्टर रुग्णालय आणि घरातून बेपत्ता झाला. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार हा डॉक्टर नऊ दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. अखेरीस बुरखा परिधान करून भारतात दाखल होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांना सीमेलगतच्या भागातून त्याला ताब्यात घेतले.

















