CoronaVirus Live Updates : रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:33 PM2021-10-07T17:33:41+5:302021-10-07T17:45:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने 23 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 237,179,214 वर पोहोचली आहे. तर 4,842,796 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 214,320,171 जणांनी कोरोनावर मात केली असून ते उपचारानंतर आता बरे झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. याच दरम्यान जगभरात संशोधन सुरू आहे. संशोधनातून आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी होत असल्याचं आता समोर आलं आहे. अशा रुग्णांमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता देखील सामान्य रुग्णांपेक्षा 43 टक्के कमी आहे. लॅन्सेट ई क्लिनिकल मेडिसिन या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे.

अमेरिकेतील मिनीसोटा विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बेसेल विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला, अमेरिकेतील 12 रुग्णालये आणि 60 क्लिनिकमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले.

सर्व रुग्ण 4 मार्च ते 27 ऑगस्ट 2020 दरम्यान कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. संशोधकांनी रक्ताच्या गुठळ्या नसलेले पण उपचार घेत असलेले रुग्ण आणि कोरोना मृत्यूची शक्यता यांच्यातील नेमक्या संबंधांचा अभ्यास केला.

यामध्ये जे रुग्ण कोरोना ग्रस्त होण्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेत होते त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 43 टक्के कमी होती असं आढळून आलं आहे. संशोधकांनी कोरोना आधी किंवा त्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी दिसून आल्याचं म्हटलं.

मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. प्रगत देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.