CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बराक ओबामा भडकले; वेब कॉल लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 11:27 AM2020-05-10T11:27:13+5:302020-05-10T12:19:32+5:30

कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झाले असून दिवसेंदिवस येथील रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बराक ओबामा यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधण्याचा एक कॉल लीक झाला आहे. ओबामा वेब कॉलद्वारे आपल्या प्रशासनाच्या काही माजी सहकार्‍यांना संबोधित करीत होते. या मिटिंगमध्ये ओबामा यांनी लोकांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिकचे संभाव्य उमेदवार जो बिडेन यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ओबामा यांनी ओबामा अलुम्नाई असोसिएशनशी संबंधित जवळपास ३०० लोकांशी संवाद साधला. या लोकांनी ओबामा यांच्या कार्यकाळात काम केले होते. यावेळी ओबामा यांनी सद्य परिस्थिती आणि आगामी निवडणुकांविषयी लोकांशी चर्चा केली. या दरम्यान त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दलही भाष्य केले.

रॉयटर्सच्या माहितीनुसार, ओबामा यांनी आपल्या माजी सहकाऱ्यांना सांगितले की, आगामी निवडणुका प्रत्येक स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. कारण, आपण फक्त एका व्यक्ती किंवा राजकीय पक्षाविरूद्ध लढत नाही. जास्तकाळ स्वार्थी, इतरांना शत्रू म्हणून पाहणे आणि अराजक होण्याच्या प्रवृत्तीविरूद्ध आपण लढत आहोत.

कोरोना विरुद्धची लढाई आपली खूप निराशाजनक आणि थंड आहे. या मानसिकतेमुळे ती एक अतिशय गोंधळलेली आपत्ती ठरली आहे, असे ओबामा यांनी सांगितले. तसेच, या वेब कॉलमध्ये ओबामा यांनी आगामी निवडणुकीत जो बिडेन यांच्यासाठीही प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ओबामांचा हा वेब कॉल याहू न्यूजच्या हवाल्याने मिळाला आहे. यामध्ये ओबामा यांनी आपल्या माजी सहकाऱ्यांशी बर्‍याच मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा केली आहे. त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आगामी निवडणुकांसाठी एकजूट करत आहेत. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने जो बिडेन यांची उमेदवारी निश्चित केली आहे. आता बराक ओबामा यांनीही जो बिडेन यांना उघडपणे समर्थन देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, बराक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अशाप्रकारे हल्लाबोल केल्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये ही ठळक बातमी झाली आहे. कारण, सामान्यत: बराक ओबामा हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कोणतेही राजकीय भाष्य करीत नाहीत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी बर्‍याच वेळा ओबामा यांच्यावर टीका केली. परंतू त्यांनी काही उत्तर दिले नाही.

याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. आगामी निवडणुकीत दोघेही आमने-सामने असण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्धच्या शर्यतीत बर्नी सँडर्स आघाडीवर होते. पण, त्यांनी आपले नाव मागे घेतले होते.

यातच कोरोना विषाणूमुळे अमेरिकेची परिस्थिती खराब झाली आहे. अमेरिकेत दररोज सरासरी एक हजाराहून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांची संख्या 78000 ओलांडली आहे. अमेरिकेत ही आकडेवारी सातत्याने वाढत आहे.