coronavirus: कोरोनाबाबत चीनची अजून एक लबाडी उघड, महिनाभर आधीच देशातील लोकांना दिली लस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 11:12 PM2020-08-25T23:12:12+5:302020-08-25T23:22:24+5:30

आपल्या देशातील लोकांना प्रायोगिक तत्त्वावर कोरानाचा प्रतिबंध करणारी लस देणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे, असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावाची सुरुवात झालेल्या चीनची या साथीच्या फैलावाबाबत सुरुवातीपासूनच संशयास्पद भूमिका राहिली आहे. दरम्यान, चीनने आपल्या देशाली लोकांना कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लस आधीच दिली असल्याचा दावा, करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने हा दावा केला आहे. आपल्या देशातील लोकांना प्रायोगिक तत्त्वावर कोरानाचा प्रतिबंध करणारी लस देणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे, असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे.

चीनने जुलै महिन्याच्या अखेरीसच कोरोनावरील ही लस कोरोनाबाबत अतिजोखमीच्या गटात मोडणाऱ्या लोकांना दिल्याचे या अमेरिकन वृत्तपत्राने म्हटले आहे. अमेरिकन वृत्तपत्राचा हा दावा खरा मानल्यास चीनने रशियाच्या तीन आठवडे आधीच आपल्या देशातील लोकांना कोरोनावरील लस देऊन बाजी मारली आहे.

मात्र रशिया आणि चीनच्या लसीमधील साम्यस्थळ म्हणजे या दोन्ही देशांच्या लसींनी वैद्यकीय चाचण्यांचे मानदंड पार केलेले नाहीत. बीजिंगमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी काही वैद्यकीय कर्मचारी आणि सरकारी उद्योगाशी संबंधित कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या अखेरीचस कोरोनाची लस दिली होती.

सध्या जगभरात कोरोनावरील लसीची चर्चा सुरू आहे. तसेच या लसीच्या चाचणीवरून दररोन नवनवा विवाद होत आहे. त्यामुळे जगातील अनेक देश याबाबतचे प्रोटोकॉल लपवून आपली लस जगाच्या समोर आणण्याच्या तयारीत आहेत.

गेल्या आठवड्यात पापुआ न्यू गिनीने चीनच्या खाणकामगारांनी कोरोनावरील लस घेतली असल्याचे सांगत त्यांना माघारी धाडले होते. त्यानंतर चीनने ही घोषणा केली होती.

चीनच्या कोरोना लसीवरील दाव्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये अस्वस्थता वाझली आहे. त्यातच अमेरिकन एफडीए कुठलीही माहिती दिल्याशिवाय कोरोनावरील लस विकसित करण्यात वेळकाढूपणा करत आहे, असा दावा केला आहे.

यापूर्वी रशियाने ११ ऑगस्ट रोजी कोरोनाला प्रतिबंध करणारी जगातील पहिली लस विकसित केल्याचा दावा केला होता. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ही घोषणा केली होती. तसेच या लसीचा पहिला डोस आपल्या मुलीला दिल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, या लसीमुळे कोरोनाविरोधात कायमस्वरूपी रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र रशियाने या लसीची चाचणी १०० हून कमी लोकांवर केली आहे.