अमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:24 PM2020-09-16T22:24:35+5:302020-09-16T22:39:01+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी कोरोना लशीसंदर्भात जगाची आशा आणखी बळकट केली आहे. टाऊन हॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात एबीसी न्यूजचा हवाला देत, चार आठवड्यांच्या आत कोरोना लशीचा शॉट तयार करण्यात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जागतिक महामारी कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

ट्रम्प म्हणाले, मागच्या प्रशासनाला फूड ड्रग्स अँड अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) आणि आणखीही इतर प्रकारच्या परवानग्यांमुळे लस मिळवायला अनेक वर्षांचा कालावधी लागला असेल. पण आम्ही ही लस मिळवण्यापासून केवळ काही आठवडेच दूर आहोत. अमेरिका केवळ तीन ते चार आठवड्यात लस तयार करेल.

पब्लिक हेल्थ ऑथोरिटीजने म्हटले आहे, की व्हाईट हाऊस FDAवर अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी लशीला मंजुरी देण्यासाठी दबाव टाकत आहे. 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

लस निर्माता कंपन्यांनी म्हटले आहे, की लशीची पूर्ण सुरक्षितता आणि प्रभाव तपासल्यानंतरच लस बाजारात आणली जाईल.

सध्या अमेरिकेतील दोन लस निर्माता कंपन्या आपल्या लशींच्या बाबतीत प्रचंड चर्चेत आहेत.

यांपैकी पहिल्या कंपनीचे नाव 'मॉडर्ना इंक', तर दुसरी कंपनीचे नाव 'नोवाव्हॅक्स', असे आहे.

मॉडर्ना इंकची लस परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर आहे. तर नोवाव्हॅक्सची लस परीक्षणाच्या मिड-स्टेजला आहे.

क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या निकालात दोन्ही लशी मोठ्या प्रमाणावर परिणामकारक ठरल्या आहेत.

अमेरिकेशिवाय चीन आणि इंग्लंडनेही, याच वर्षी कोरोनालस उपलब्ध करण्याचा दावा केला आहे.

रशियाने तर पहिली कोरोना लस तयार करण्यात यशस्वी झाल्याचा दावाही केला आहे. मात्र, अद्याप त्यांनी Sputnik-v लशीचे रिसर्च फॅक्ट्स समोर ठेवलेले नाहीत.

कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेलाच बसला आहे. येथे आतापर्यंत तब्बल 67 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

या महामारीने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही जबरदस्त हादरा दिला आहे. कोरोनाने येथे आतापर्यंत दोन लाखहून अधिक लोकांचे बळी घेतले आहेत.