पृथ्वीवर येत असलेल्या महासंकटापासून चीन जगाला वाचवणार, थेट अ‍ॅस्ट्रॉइडवर हल्ला करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 06:16 PM2021-07-11T18:16:10+5:302021-07-11T18:21:59+5:30

China launch asteroid deflecting rocket: कोरोनाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे जगभरातून टीकेचे लक्ष्य़ झालेल्या चीनने पृथ्वीवर येणाऱ्या मोठ्या संकटापासून जगाचा बचाव करण्यासाठी आखली मोठी योजना...

आपल्या पृथ्वीवर अंतराळातून लघुग्रह, उल्कापिंडांच्या रूपात अनेकदा संकटं येत असतात. दरम्यान, आता पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या अशा संकटापासून जगाला वाचवण्याची जबाबदारी चीनने घेतली आहे. चीन पृथ्वीला आर्मागेडॉनपासून वाचवणार आहे. त्यासाठी चीन पृथ्वीवर येणाऱ्या या लघुग्रहावर त्यांच्याकडे असलेल्या सर्वात मोठ्या रॉकेटच्या रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करणार आहे. त्यामुळे या लघुग्रहाची दिशा बदलणार आहे. त्यासाठी चीन विशेष योजना आखत आहे.

पृथ्वीच्या दिशेने एक मोठा लघुग्रह येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास मानवासह पृथ्वीवरील सजीवसृष्टी मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ शकते. त्यामुळे या लघुग्रहावर २३ रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करून त्याची दिशा बदलण्याची योजना चीनने आखली आहे.

चीन ज्या लघुग्रहावर हल्ला करण्याची योजना आखत आहे त्याचे नाव बेन्नू असे आहे. हा लघुग्रह ७७५० कोटी किलोग्रॅम वजनाचा आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. एवढेच नाही तर हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जरी गेला तरी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कारण त्याची गती आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जी ऊर्जा निर्माण होईल ती पृथ्वीसाठी विनाशकारी ठरू शकते.

अॅस्ट्रॉइड बेन्नू हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये सन २१७५ ते २१९९ यादरम्यान येण्याची शक्यता आहे. म्हणजेच ही घटना १५४ ते १७८ वर्षांदरम्यान होण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता फारच अल्प आहे. मात्र तज्ज्ञ कुठल्याही प्रकारचा धोका स्वीकारण्यास तयार नाही आहेत. हा लघुग्रह अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या आकाराचा आहे. एवढा मोठा लघुग्रह समुद्रात जरी पडला तरी त्याच्या वजनाने येणाऱ्या समुद्राच्या लाटेने संपूर्ण जगात विद्ध्वंस होऊ शकतो.

बेन्नू हा लघुग्रह जर पृथ्वीवर आदळला तर सुमारे १२०० मेगाटन कायनेटिक एवढी उर्जा निर्माण होईल. ही ऊर्जा हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा ८० हजार पट अधिक असेल. डायनासोरचे अस्तित्व संपवणाऱ्या लघुग्रहाचा विचार केल्यास त्याने सुमारे १०० दशलक्ष मेगाटन ऊर्जा निर्माण केली होती. त्या तुलनेत बेन्नूच्या माध्यमातून कमी उर्जा निर्माण होईल.

चीनच्या नॅशनल स्पेस सायन्स सेंटरने मांडलेल्या गणितानुसार बेन्नू या लघुग्रहाची दिशा बदलण्यासाठी २३ रॉकेट प्रक्षेपित करावी लागतील. त्यासाठी चीन त्यांच्याकडील सर्वात मोठे रॉकेट असलेल्या लाँग मार्च ५ याचा वापर करणार आहे. या एका रॉकेटचे ९०० मेट्रिक टन म्हणजेच ९ लाख किलोग्रॅम एवढे वजन आहे.

ही २३ रॉकेट जेव्हा बेन्नू या लघुग्रहावर आदळतील तेव्हा तो पृथ्वीपासून ९ हजार किलोमीटर दूर जाईल. हे संशोधन Icarus नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. कुठल्याही लघुग्रहाची दिशा बदलणे सोपे नाही. मात्र आपण भविष्यात ही कामगिरी करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, असे या संशोधनाचे प्रमुख लेखल मिंगताओ यांनी सांगितले.

आपण हॉलिवूड चित्रपट आर्मागेडॉनमध्ये दाखवल्याप्रमाणे बेन्नू या लघुग्रहावर अणुबॉम्ब फोडू शकत नाही. कारण त्यामुळे धोका कमी न होता वाढेल. अणुबॉम्बच्या स्फोटामुळे होणारे लघुग्रहाचे तुकडे दिशा बदलू शकणार नाहीत. त्यांची गती अधिक असू शकते, अशी भीती मिंगताओ यांनी व्यक्त केली.

अमेरिकेच्या प्लॅनपेक्षा चीनची योजना थोडी विस्तृत आणि खर्चिक आहे. अमेरिकेच्या नासानेसुद्धा हायपरवेलोसिटी अॅस्टॉइड मिटिगेशन फॉर एमर्जन्सी रिपसॉन्स तयार केला आहे. त्यामध्ये ३० फूट लांब स्पेसक्राट लघुग्रहावर आदळवले जाईल. नासाच्या अंदाजानुसार हॅमर स्पेसक्राफ्ट्स लघुग्रहावर ३४ ते ५३ वेळा आदळवावी लागतील. म्हणजेच प्रत्येक स्पेसक्राफ्ट एक एक टक्कर देईल.

नासाचे हा प्रयोग बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीवर टक्क देण्यापूर्वी १० वर्षे आधी सुरू होईल. जेणेकरून प्रत्येक टक्करीनंतर लघुग्रह आपला मार्ग बदलत राहील. कदाचित कमी टक्करींमध्येच हा लघुग्रह सुरक्षित अंतरावर जाईल.