Corona Virus : चीनमध्ये घरोघरी कोरोना! 1 आठवड्यात 13 हजार मृत्यू, 'हे' 10 संकेत देतात मोठ्या धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:49 AM2023-01-23T11:49:31+5:302023-01-23T12:09:30+5:30

China Corona Virus : चीनमध्ये आतापर्यंत 80 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे, गेल्या आठवड्यात येथे 13000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दर आठवड्याला हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. हे सर्व असूनही चीन सतत आकडे लपवण्याचा आणि परिस्थिती सामान्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. डेटा लपवल्याबद्दल WHO ने चीनला अनेकदा फटकारले आहे. या सगळ्यामध्ये चीनमध्ये कोरोनाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.

चीनमध्ये आतापर्यंत 80 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे, गेल्या आठवड्यात येथे 13000 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनबद्दल असे खुलासे होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, ज्यावरून चीनमध्ये कोरोनाने कसा कहर केला आहे किंवा भविष्यात परिस्थिती किती भीषण होऊ शकते हे दिसून येते. 10 संकेत मोठ्या धोक्याचा इशारा देत आहेत.

1- चीनने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कठोर झिरो कोविड पॉलिसी संपुष्टात आणली होती. हे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून लागू होते. चीनमध्ये कोविड पॉलिसीला खूप विरोध झाला, त्यामुळे जिनपिंग सरकारने झिरो कोविड पॉलिसी संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली.

2- चीनमध्ये गेल्या 1 महिन्यात जवळपास 60 हजार लोकांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या वैद्यकीय व्यवहार विभागाचे संचालक जियाओ याहुई यांनी काही काळापूर्वी खुलासा केला होता की, देशात 8 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत एकूण 59938 लोकांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

3- चीनमध्ये गेल्या एका आठवड्यात (13-19 जानेवारी) महामारीमुळे 13000 लोकांनी आपला जीव गमावला आहे. चीनमधील आघाडीचे शास्त्रज्ञ वू जुनाओ यांनी दावा केला आहे की, चीनमधील प्रत्येक 10 पैकी आठ (म्हणजे 80%) लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चिनी शास्त्रज्ञाचा हा दावा अशा वेळी समोर आला आहे जेव्हा चीन लूनर न्यू ईयर साजरे करत आहे.

4- चीनमधील कोरोनाच्या स्थितीबाबत डिसेंबरमध्ये एक धक्कादायक अहवाल समोर आला होता. येथे डिसेंबरमध्ये 20 दिवसांत 25 कोटी लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सरकारी कागदपत्रे लीक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रेडिओ फ्री एशियाने सोशल मीडियावर फिरत असलेल्या कागदपत्रांचा हवाला देत हे उघड केले की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'झिरो-कोविड पॉलिसी' शिथिल केल्यानंतर, परिस्थिती गंभीर बनली.

5- एएफपी या वृत्तसंस्थेकडून गेल्या काही दिवसांत एक रिपोर्ट आला होता. त्यानुसार हेनान प्रांताच्या आरोग्य आयोगाचे संचालक कान क्वानचेंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 6 जानेवारी 2023 पर्यंत हेनानमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 89.0 टक्के होते. म्हणजेच, हेनानमधील 99.4 मिलियन लोकसंख्येपैकी 88.5 मिलियन म्हणजेच 8.84 कोटी लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली होती.

6- अलीकडेच चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या विनाशाचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. यामध्ये चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. अनेक शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेडच शिल्लक नाहीत. औषधांचाही मोठा तुटवडा आहे. बीजिंगसह अनेक प्रांतातून धक्कादायक व्हिडिओ समोर आले. स्मशानभूमीवर मोठी रांग लागली होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना वाट पाहावी लागत आहे.

7- चीनने 8 जानेवारीपासून आपल्या सीमा पूर्णपणे खुल्या केल्या आहेत. एवढेच नाही तर चीनमधून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे नियमही रद्द करण्यात आले आहेत. चीननेही कोरोनाच्या मृत्यूबाबतचे नियम बदलले आहेत. जेणेकरून कोरोनामुळे मृतांचा आकडा कमी राहील. चीनची सीमा खुली करण्याच्या घोषणेनंतर अमेरिका, भारत आणि युरोपातील सर्व देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली.

चीनमधून नुकत्याच इटलीत आलेल्या दोन फ्लाइटमधील निम्म्याहून अधिक प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर इटलीने चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, इटलीला 2020 सारखी चूक पुन्हा करायची नाही. त्यानंतर इटली हा युरोपमधील पहिला देश होता, जिथे कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला.

8- चीनच्या चेंगदूमध्येही कोरोनाने मोठा विध्वंस केला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, येथील सर्वात मोठ्या रुग्णालयातील Huax येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात खूप व्यस्त आहेत. रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मी 30 वर्षांपासून हे काम करत आहे. पण आता इतका व्यस्त कधीच नव्हतो.

रुग्णालयांच्या आत आणि बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रुग्णवाहिकेतील सर्व रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात तैनात असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले होते की, बहुतांश रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयात कोरोनाच्या औषधांचा साठा नाही. रुग्णांना फक्त सामान्य लक्षणांसाठी औषधे दिली जात आहेत.

9- चीनच्या बीजिंग, अनसन आणि शांघायसारख्या मोठ्या शहरांमधून असे अनेक व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये विध्वंसाचे दृश्य स्पष्टपणे दिसत होते. या शहरांमधील रुग्णालयांमध्ये बेडच शिल्लक राहिले नाहीत. जमिनीवर पडून रुग्णांवर उपचार केले जात होते. एवढेच नाही तर स्मशानभूमीतही लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

10- कोरोनाशी संबंधित मृत्यूची आकडेवारी जगासमोर येऊ नये, यासाठी चीन जोरदार प्रयत्न करत आहे. फॉर्मवर सही करूनच लोकांना त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह रुग्णालयातून दिले जात आहेत. यामध्ये लोकांना त्यांच्या नातेवाईकांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचे लेखी द्यावे लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.