War Olympics मध्ये चीन आणि रशियाची एकमेकांना साथ; भारत अन् अमेरिकेचं टेन्शन वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:21 PM2020-09-04T12:21:43+5:302020-09-04T12:25:35+5:30

कोरोना संकटामुळे यावर्षीची टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आली होती, परंतु सध्या रशियामध्ये आणखी एक ऑलिम्पिक सुरू आहे. चीनही त्यात सहभागी आहे. युद्ध ऑलिम्पिक(War Olympics) असं या ऑलिम्पिकचं नाव आहे. येथे टँकची शर्यत आहे, बॉम्ब आणि गोळ्यांनी लक्ष्य केले जाते.

रशियाने २०१५ मध्ये युद्ध ऑलिम्पिकची सुरुवात केली होती. यामागे खेळाबरोबर पारंपारिक लढाऊ कौशल्ये एकत्रित करण्याचा हेतू होता. जेणेकरुन कोणत्या देशाचे सैन्य आणि त्याची शस्त्रे सर्वात चांगली आहेत हे समजू शकेल. किंवा रणांगणात त्यांची क्षमता किती आहे हे जाणून घेता येईल. या खेळामध्ये रशिया आणि चीनमधील संबंध दृढ होत आहेत. त्यामुळे अमेरिका आणि भारत दोघेही टेन्शनमध्ये आहेत.

या युद्ध ऑलिम्पिकमध्ये चीन आणि रशिया जवळ आले आहेत. चीनमधील सुमारे २६० सैनिकांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. या ऑलिम्पिकमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चे लोक दोन डझनहून अधिक खेळांमध्ये सहभाही आहेत. टँक बायथलॉन, ऑर्डर व्हेइकल ट्रायल्स, मिलिटरी इंटेलिजेंस, मरीन प्लाटून लँडिंग इव्हेंट, एअरबोर्न ट्रूप्स कॉम्पिटीशन असे खेळ असतील.

चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते ज्येष्ठ कर्नल रेन गुओकियांग म्हणाले की, कोविड -१९ शी संपूर्ण जग संघर्ष करत असताना अशा वेळी युद्ध ऑलिम्पिक होत आहेत. या ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन चीन रशियाबरोबरचे आपले नाते आणखी मजबूत करेल. यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांना एकमेकांच्या डावपेच शिकण्यास मदत होईल.

या ऑलिम्पिकमध्ये ३० देशांचे १६० संघ भाग घेत आहेत. हा ऑलिम्पिक रशियाने सुरू केला होता कारण अमेरिका हवाई बेटांजवळील त्याच्या मित्र देशांचा एक खेळ आयोजित करत होती. युद्ध ऑलिम्पिकचे बरेच खेळ रशियामध्ये होत आहेत, परंतु काही खेळ बेलारूसमध्ये असतील. जेथे सध्या अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को विरोधात प्रदर्शने सुरु आहेत.

गेल्या दशकापासून रशिया आणि चीन एकत्रितपणे संयुक्त सैन्य सराव करीत आहेत. यामुळे, अमेरिका आणि भारतासह चीनच्या शेजारी देशांमध्ये चिंता कायम आहे. २०१२ पासून चीन आणि रशियानेही अनेक वेळा संयुक्त नौदल सराव केला असून त्यामुळे अमेरिका अस्वस्थ आहे. हा सराव बहुधा विवादित दक्षिण चीन समुद्रात होतो. या व्यतिरिक्त ओमानच्या आखातीमध्येही अभ्यास केला जातो.

युद्ध ऑलिम्पिकपूर्वी, चीन आणि रशिया यांनी संयुक्तपणे कोरियाच्या द्वीपकल्प आणि जपानच्या सागरी भागात जुलै २०१९ मध्ये बॉम्बर विमानाने पेट्रोलिंग करण्याचा सराव केला होता. चीन रशियाबरोबर सतत सराव करत आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये चीनने रशियाला ३२०० सैन्य आणि ९०० टँक्स पाठवले. ते ३ लाख रशियन सैनिक आणि ३६ हजार टँकसह सायबेरिया आणि वोस्तोक येथे सैनिकी कवायतींमध्ये सहभागी होते.

१९९१ मध्ये सोव्हिएत युनियन फुटल्यानंतर रशियाने सतत आपले सैन्य सामर्थ्य वाढवले आहे. बऱ्याच शेजारच्या देशांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. त्याला ताजिकिस्तान ते सिरिया पर्यंतच्या समस्यांचा सामना करावा लागला. या निमित्ताने चीन त्याच्याबरोबर सामील होणे हा रशियासाठी फायदेशीर करार होता. चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचा फायदा रशियालाही होतो.

सीरियामध्ये रशियाच्या खराब अनुभवानंतर व्होस्टोक -२०१८ लष्करी सरावाची सुरुवात झाली. यामध्ये लष्करी अभ्यासाचे असं मॉडेल तयार केले गेले की लोकांना सीरियासारख्या युद्धाची परिस्थिती समजेल. या प्रथेचा चीनलाही मोठा फायदा झाला. रशियन सैनिकांसह त्याच्या सैनिकांनीही यात भाग घेतला.

दरम्यान, रशियाला चीनबरोबरच्या नवीन लष्करी तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्यायचे आहे. म्हणून, अशा सरावादरम्यान, जेव्हा नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित केले जाते, तेव्हा सैन्य अधिकारी देखील याबद्दल बोलतात. नंतर हे संभाषण संरक्षण करारात रूपांतरित होते. (सर्व फोटो: रॉयटर्स)

Read in English