बोरिस जॉन्सन सरकार 'या' स्कँडलमुळे अडचणीत आल्याची चर्चा; नेमकं प्रकरण काय?, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 02:28 PM2022-07-07T14:28:56+5:302022-07-07T14:34:19+5:30

चार मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे जॉन्सन यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. स्व:पक्षासोबतच विरोधी पक्षाकडूनही राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाब वाढत आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सरकारमधील ३९ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन सरकार संकटात सापडलं आहे. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला आहे.

विश्वासमत जिंकून देताना बोरिस जॉन्सन यांच्या बाजूने खासदारांची मतं वळवण्याचं महत्त्वाचं काम ख्रिस पिंचर या त्यांच्या खूप जवळच्या सहकाऱ्याने आणि तेव्हाच्या डेप्युटी चिफ व्हिपने केलं होतं. पण, आता याच ख्रिस पिंचर यांच्या वर्तणुकीमुळे बोरिस जॉन्सन अडचणीत आले आहेत.

ख्रिस पिंचर स्वत: समलैंगिक विवाहाचे पुरस्कर्ते आहेत आणि २०१७च्या नोव्हेंबरमध्ये ग्रेट ब्रिटनचे आघाडीचे रोईंग खेळाडू अॅलेक्स स्टोरी यांनी त्यांच्याविरोधात लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप केला होता. अॅलेक्स स्टोरी हे ख्रिस पिंचर यांच्याच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत.

सतत नकार देऊनही दारूच्या नशेत असलेल्या पिंचर यांनी आपलं ऐकलं नाही, असं अॅलेक्स स्टोरी म्हणाले होते. त्यानंतर डिसेंबर २०१७मध्ये आणखी एक खासदार टॉम बेनक्लिनसॉप यांनीही असाच आरोप केला.

ब्रिटिश संसदेचं कामकाज योग्य पद्धतीने चालवण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीवरच असा आरोप होणं ही गंभीर गोष्ट होती. त्यामुळे हे प्रकरण तेव्हा 'वेस्टमिन्स्टर सेक्श्युअल अॅलिगेशन्स' या नावाने खूप गाजलं होतं. याच प्रकरणांवरून जून २०२२मध्ये त्यांनी व्हिप पदाचा राजीनामाही दिला होता. पण, त्यानंतर एका महिन्याने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबतीत एक विचित्र कबुली दिली आहे.

हो, मी हे मान्य करतो की, ती माझी चूक होती. आता विचार केला की मला कळतं, माझं वागणं चुकीचं होतं. आणि माझ्या निर्णयामुळे ज्यांना मनस्ताप झाला त्यांची मी माफी मागतो, असं बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं.

दरम्यान, चार मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे जॉन्सन यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. स्व:पक्षासोबतच विरोधी पक्षाकडूनही राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाब वाढत आहे. नजीकच्या काळात जॉन्सन यांना संसदेती विरोधी पक्षाच्या खासदारांच्या परखड सवालांना सामोरे जावे लागू शकते. मंगळवारी वित्तमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी राजीनामा दिला.

राजीनाम्याची घोषणा करताना ऋषी सुनक म्हणाले की, सरकारने पूर्ण क्षमतेने काम करावे, ही लोकांची अपेक्षा योग्य आहे. त्यासाठी आपण लढायला हवे. मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. सध्या देशापुढे अनेक आव्हाने आहेत.