ब्रिटनच्या पंतप्रधानांकडूनच लॉकडाऊनचा भंग? बोरिस जॉन्सन दिसले बागेत!

By मोरेश्वर येरम | Published: January 12, 2021 07:59 PM2021-01-12T19:59:38+5:302021-01-12T20:08:37+5:30

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे ब्रिटनमध्ये सध्या कडक लॉकडाऊन आहे. पण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आलं आहे.

देशात लॉकडाऊन असताना आपल्या निवासस्थानापासून ११ किमी अंतरापर्यंत सायकल चालवल्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर टीका केली जात आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात असतानाच पंतप्रधान मात्र घराबाहेर फेरफटका मारत आहेत.

बीबीसीच्या माहितीनुसार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सायकलिंग करताना दिसून आले. जॉन्सन यांनी रविवारी लंडनच्या पूर्व भागात असलेल्या ऑलम्पिक पार्कमध्ये फेरफटका मारत असल्याचे दिसून आले होते.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन ऑलम्पिक पार्कात नेमकं कारने पोहोचले होते की सायकलने? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप पंतप्रधान कार्यालयाने दिलेली नाही.

बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं पालन केलं आहे, असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.

लंडनमध्ये कोरोनाची स्थिती सध्या चिंताजनक आहे. नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अशावेळी लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्यासाठी पंतप्रधानांनी आदर्श निर्माण करायला हवा, असं लेबर पार्टीचे नेते एन्डी स्लॉटर यांनी सांगितलं.

एका प्रत्यक्षदर्शी महिलेने बोरिस जॉन्सन यांना पार्कात सायकल चालवताना पाहिल्याचं एका वृत्त वाहिनीला सांगितलं आहे. पंतप्रधानांचा निष्काळजीपणा पाहून आपल्याला धक्काच बसला होता, असंही त्या महिलेने सांगितलं.

जॉन्सन यांनी राहत्या घरापासून ११ किमी दूरवर सायकल चालवत जाण्याबाबत ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनाही विचारण्यात आलं. त्यावर हॅन्कॉक यांनी जॉन्सन यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.