काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:44 IST2025-11-10T11:32:00+5:302025-11-10T11:44:38+5:30

America Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लादलेल्या वाढीव टॅरिफचे समर्थन करताना त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत आणि सन्मानित देश झाल्याचे म्हटले आहे.

America Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या विविध दाव्यांमुळे कायम चर्चेत असतात. एकीकडे जगभरातील देशांवर टॅरिफ लादत असताना दुसरीकडे भारताबाबत अनेक दावे डोनाल्ड ट्रम्प करतात. ऑपरेशन सिंदूरपासून ते रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीपर्यंत भारताबाबत परस्पर अनेक दावे डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

जगभरातील देशांवर वाढील टॅरिफ लादत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न डोनाल्ट ट्रम्प करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीला अमेरिकेतूनच मोठा विरोध होत असल्याचेही दिसत आहे. तसेच आपल्या नीती, निर्णयाचे समर्थन डोनाल्ड ट्रम्प करताना दिसतात.

आताही डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत मोठे दावे केले आहेत. जे लोक टॅरिफचा विरोध करत आहेत, ते मूर्ख आहेत. त्यांच्या प्रशासनाने अमेरिकेला जगातील सर्वांत श्रीमंत, सर्वात प्रतिष्ठित देश बनवले आहे. जिथे कोणतीही महागाई नाही आणि विक्रमी शेअर बाजार किंमत आहे.

देशाला टॅरिफमधून ट्रिलियन डॉलर्स मिळत आहेत. ज्याचा वापर ३७ ट्रिलियन डॉलर्सचे राष्ट्रीय कर्ज कमी करण्यासाठी केला जाणार आहे. त्यांचे प्रशासन लवकरच ते फेडण्यास सुरुवात करेल. त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत आणि सन्मानित देश झाला आहे. यातून रेकॉर्ड स्टॉक वॅल्यू, हाय बॅलन्स आणि नवे कारखाने लागत आहेत. टॅरिफमुळे गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी दोन्ही वाढल्या आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प प्रशासन जवळपास सर्व अमेरिकन लोकांना प्रति व्यक्ती किमान २००० डॉलर्सचा लाभांश जारी करेल. लवकरच बहुतेक सर्व अमेरिकन नागरिकांना २००० डॉलर्सचा ‘टॅरिफ डिव्हिडंड’ (लाभ) देणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प यांनी प्रस्तावित टॅरिफ लाभ नेमका कशा प्रकारे वितरित केला जाईल किंवा तो कधी लागू होईल याबद्दल अधिक माहिती शेअर केली नाही.

दरम्यान, ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात लादलेल्या जागतिक शुल्काबाबत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू होत असताना, जगभरात शुल्काबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. हा खटला अमेरिकन न्यायालयांमध्ये एक महत्त्वाचा आर्थिक मुद्दा मानला जातो.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवरून पुन्हा एकदा वादविवाद सुरू झाला आहे. त्यांचे समर्थक हे आर्थिक बळकटीचं लक्षण मानत आहेत, तर टॅरिफमुळे देशात महागाई वाढत असून जनतेवर अतिरिक्त भार टाकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

ट्रम्प यांच्या २००० डॉलर्सच्या लाभ देण्याच्या नव्या आश्वासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून ही योजना नेमकी कशा प्रकारे काम करेल? असे सवाल विचारले जात आहे.

व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, सरकारला कोणत्याही संभाव्य न्यायालयाच्या निर्णयाची जाणीव आहे. परंतु त्यांच्या कायदेशीर युक्तिवादांवर विश्वास आहे. आम्हाला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालय कायदा आणि तथ्यांच्या आधारे योग्य निर्णय देईल. हे प्रकरण केवळ ट्रम्प प्रशासनासाठीच नाही तर भविष्यातील प्रशासनांसाठी देखील टॅरिफ धोरण परिभाषित करेल.