होर्मुझचा तिढा सुटत नाही तोच सुएझ कालवा बंद होणार...? इराण समर्थक बंडखोरांचा इशारा, PHOTO दिसतोय तोच भाग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 14:38 IST2026-03-13T14:33:07+5:302026-03-13T14:38:26+5:30
Middle East War 2026 Updates : इराणने 'बाब-अल-मंदेब' जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. भारताची ८५% तेल आयात धोक्यात आली असून इंधनाचे दर प्रचंड वाढण्याची भीती आहे. वाचा सविस्तर विश्लेषण.

मध्य पूर्वेतील तणाव आता पराकोटीला पोहोचला असून, इराणच्या समर्थक बंडखोर गटाने जगाला मोठा इशारा दिला आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' नंतर आता इराणने जगाची दुसरी महत्त्वाची ऊर्जा जीवनवाहिनी 'बाब-अल-मंदेब' बंद करण्याची धमकी दिली आहे.

सुएझ कालवा हा युरोपला आखाती देश, आफ्रिका खंडाशी जोडतो. त्याला जाणारा मार्ग हा येमेनच्या समुद्रातून जातो. येमेनच्या समुद्रात असा एक पॉईंट आहे जो दक्षिण आफ्रिकेचा जिबूती नावाचा देश आणि येमेन यांच्यातील एक निमुळता भाग आहे. त्याला बाब-अल-मंदेब असे म्हटले जाते. या टापूवर हुती बंडखोरांचे नियंत्रण आहे.

हुती बंडखोर तेच ज्यांनी इस्रायलने गाझावर हल्ला केला होता तेव्हा जहाजांवर हल्ले चढविले होते. या भागातून तेव्हा जहाजे जाण्यास कचरत होती. या बंडखोरांना इराणची ताकद मिळण्याची शक्यता आहे.

भारताची ८५ ते ९० टक्के तेल आणि गॅस आयात याच दोन जलमार्गांवर अवलंबून आहे. होर्मुझ आधीच विस्कळीत झाल्याने देशात एलपीजी (LPG) आणि इंधनाची टंचाई भासत असताना, आता बाब-अल-मंदेबवरही संकट आले आहे.

भारत आपल्या गरजेच्या ३५ टक्के व्यापारासाठी लाल समुद्र आणि स्वेज कालव्याचा वापर करतो, ज्याचा मुख्य मार्ग बाब-अल-मंदेब आहे. रशियन तेल टँकरही याच मार्गावरून ये-जा करणार आहेत.

काय आहे 'बाब-अल-मंदेब'?
याला अरबी भाषेत 'दुःखाचे द्वार' असे म्हटले जाते. हा २६ किलोमीटरचा समुद्री मार्ग येमेन आणि जिबूती यांच्या दरम्यान असून, तो लाल समुद्राला अदनच्या खाडीशी जोडतो. येथून दररोज सुमारे ६२ लाख बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने वाहून नेली जातात.

येमेनमधील इराण समर्थक 'हुथी' बंडखोरांचे या क्षेत्रावर नियंत्रण असल्याने, इराण त्यांच्या माध्यमातून हा मार्ग बंद करू शकतो. सौदी अरबचे बहुतांश तेल प्रकल्प लाल समुद्राच्या किनारी आहेत. इथूनच भारत आणि चीनला मोठ्या प्रमाणावर तेल पुरवठा होतो.

जर हुतींनी आपला शब्द खरा केला आणि एक थेंबही तेल बाहेर पडू दिले नाही, तर जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर गगनाला भिडतील भारतासह युरोपचे मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

















