Ayman al-Zawahiri: बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने तेच पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:26 PM2022-08-02T12:26:40+5:302022-08-02T12:39:57+5:30

२०११मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने (Ayman al-Zawahiri) अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले.

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

अमेरिकेने जवाहिरीचा नेमका खात्मा कसा केला, याबाबत माहिती दिली आहे. जवाहिरीने केलेली एक चूक त्याला महागात पडली आणि अमेरिकेने संधी साधली असल्याची माहिती समोर आली आहे. अल जवाहिरी हा याआधी पाकिस्तानमध्ये लपला होता. मात्र, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये परतला. तालिबानचा गृहमंत्री आणि कुख्यात दहशतवादी सिरादुद्दीन हक्कानीने जवाहिरीला सर्वात सुरक्षित स्थळी लपवले होते.

जवाहिरीच्या मागावर असलेल्या अमेरिकेला त्याचा ठावठिकाणा त्याच्या एका सवयीमुळे लागली असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. अल जवाहिरी हा दररोज सकाळी घराच्या बाल्कनीत येऊन काही तासांसाठी थांबत असे. त्याच्या या सवयीमुळे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा संशय बळावला. त्यानंतर हा जवाहिरी असल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकन गुप्तचर संघटनेने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानंतर नियोजन करत अमेरिकेने रिपर ड्रोनने हेलफायर क्षेपणास्त्र डागत जवाहिरीचा खात्मा केला.

दरम्यान, २०११मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. तो आणि लादेन हे अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याचे सूत्रधार होते. जवाहिरी हा अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’पैकी एक होता. तोच दहशतवादी कारवायांना पुढे नेत होता. हा दहशतवादी नेता आता राहिला नाही, असे जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसच्या सायंकाळच्या भाषणात जाहीर केले.

जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार, असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे. या हल्ल्यादरम्यान इतर कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती बायडन यांनी दिली आहे.