America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:20 IST2025-12-06T18:15:10+5:302025-12-06T18:20:10+5:30
अमेरिकेला जाऊन तिथे सेटल होण्याचे किंवा कामाच्या निमित्ताने वास्तव्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

अमेरिकेला जाऊन तिथे सेटल होण्याचे किंवा कामाच्या निमित्ताने वास्तव्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेने H-1B व्हिसासाठी आता काही नवीन आणि अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार, तुमचा व्हिसा मंजूर करायचा की नाही, हे आता तुमची सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी ठरवणार आहे.

अमेरिकेने १५ डिसेंबरपासून लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, H-1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले सोशल मीडिया अकाउंट 'ओपन' ठेवावे लागणार आहे. अमेरिकन अधिकारी आता तुमच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीची तपासणी करतील.

जर कोणतीही पोस्ट, लाईक, शेअर किंवा कमेंट त्यांना जोखमीची वाटली, तर तुमचा व्हिसा तात्काळ रद्द केला जाऊ शकतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, लिंक्डइन यांसारख्या सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा या तपासणीत समावेश असेल.

यात फक्त तुमच्या स्वतःच्या पोस्टच नाहीत, तर तुम्ही कोणाला फॉलो करता, कोणत्या पोस्टला लाईक करता आणि कोणते कंटेंट शेअर करता, हे सर्व तपासले जाईल. एका प्रकारे, हे तुमचे 'डिजिटल बॅकग्राउंड चेक' म्हणून काम करेल. ट्रम्प प्रशासनाने या बदलांना मंजुरी दिली आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सोशल मीडिया तपासणीचे हे नियम फक्त H-1B अर्जदारांवरच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबावरही लागू होणार आहेत. H-4 व्हिसावर अमेरिकेत जाणाऱ्या पत्नी, मुले आणि पालकांनाही त्यांची सोशल मीडिया प्रोफाइल पब्लिक ठेवावी लागेल.

कौशल्यपूर्ण कामगार व्हिसासाठी इतकी कडक डिजिटल तपासणी अनिवार्य करण्याची ही अमेरिकेची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, विद्यार्थी आणि व्हिजिटर व्हिसावर ही अट लागू करण्यात आली होती.

या बदलाचा सर्वात मोठा परिणाम भारतीय व्यावसायिकांवर होणार आहे, कारण H-1B व्हिसाच्या एकूण कोट्यापैकी जवळपास ७० टक्के व्हिसा भारतीय व्यावसायिकांना मिळतात.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेल्या भारतीयांसाठी आता रिजेक्शनचा धोका आणि तपासणीचा दबाव दोन्ही वाढणार आहे. अमेरिकेला जगभरातील उच्च-कुशल प्रतिभेला आपल्या देशात आणता यावे, यासाठी १९९० मध्ये H-1B व्हिसा योजना सुरू करण्यात आली होती.

















