भीषण आगीनं कॅलिफोर्नियाचा आसमंत भगवा; ४ लाखांहून अधिक एकरावर पसरली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 05:36 PM2020-09-10T17:36:34+5:302020-09-10T17:40:16+5:30

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जंगलाला भीषण आग लागली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग अतिशय वेगानं पसरली.

जंगलात लागलेल्या आगीमुळे ओरेगॉनमधील शेकडो घरं भस्मसात झाली आहेत. आगीमुळे प्रथमच ओरेगॉन राज्याचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं गव्हर्नर केट ब्राऊन यांनी सांगितलं.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र त्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.

कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेली आग अद्यापही धुमसते आहे. त्यामुळे संपूर्ण आसमंत भगव्या रंगानं व्यापला आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते अपुरे पडत आहेत. जंगलात ८० किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत. त्यामुळे आग वेगानं पसरत आहे.

वाऱ्याच्या वेगामुळे आगीची भीषणता वाढतच चालली आहे. त्यामुळे ओरेगॉनच्या पश्चिमेकडील काही भागांतील घरं तत्काळ रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आग वेगानं पसरत असल्यानं पुढील काही दिवस आणखी आव्हानात्मक असतील, असा गंभीर इशारा गव्हर्नर केट ब्राऊन यांनी दिला आहे.

कालपर्यंत आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेकांची घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

कॅलिफॉर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगामुळे आतापर्यंत ५ वसाहती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.

आपत्कालीन यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, ४ लाख ७० हजार एकर परिसरात आग पसरली आहे. त्यापुढे अग्निशमन दलाची यंत्रणादेखील कमी पडत आहे.