भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:50 IST2025-08-12T17:43:11+5:302025-08-12T17:50:23+5:30

अक्साई चीन भारताचा अविभाज्य भाग आहे, परंतु १९५० पासून तो चीनच्या ताब्यात आहे. याच भागातून चीनचा नवीन रेल्वे मार्ग तिबेटशी जोडला जाईल.

चीन तिबेटला शिनजियांगशी जोडणारा एक मोठा रेल्वे प्रकल्प सुरू करणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून (LAC), म्हणजेच अक्साई चीनमधून जाईल. या भागावरुन भारत आणि चीनमध्ये अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. हीच रेल्पे लाईन पुढे नेपाळच्या सीमेवरुन २०१७ च्या डोकलाम वादाच्या संवेदनशील चंबी खोऱ्यात पोहोचेल. चीनचा हा प्रकल्प भारतासाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे.

चीनने २००६ मध्ये पहिल्यांदा तिबेटला रेल्वे नेटवर्कशी जोडले. त्या वर्षी गोलमुड ते ल्हासा ही ट्रेन ४,००० मीटर उंचीवर पर्माफ्रॉस्ट (गोठलेल्या माती) मधून ताशी १०० किमी वेगाने धावली. तिबेटला चीनच्या रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचे हे पहिले पाऊल होते. त्यानंतर २०१४ मध्ये ल्हासा-शिगात्से आणि २०२१ मध्ये ल्हासा-न्यिंगची रेल्वे मार्ग सुरू करण्यात आले. आता चीन आपले रेल्वे नेटवर्क अधिक खोलवर नेऊ इच्छित आहे, विशेषतः भारतीय सीमेजवळ.

चीन २००८ पासून या नवीन रेल्वे प्रकल्पाची योजना आखत होता, जो आता अंमलात आणण्यासाठी तयार आहे. हा रेल्वे मार्ग शिनजियांगमधील होतान ते तिबेटमधील ल्हासा पर्यंत जाईल. ही लांबी सुमारे २००० किमी लांबीची असेल. ही तिबेटमधील शिगात्से पासून सुरू होईल आणि नेपाळच्या सीमा आणि अक्साई चीनमधून शिनजियांगमधील होतान पर्यंत पोहोचेल.

हा मार्ग कुनलुन, काराकोरम, कैलास आणि हिमालय पर्वतरांगांमधून जाईल, जिथे सरासरी उंची ४५०० मीटरपेक्षा जास्त असेल. हिमनद्या आणि पर्माफ्रॉस्टसारख्या कठीण परिस्थितीमुळे बांधकाम करणे आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीतही चीन रेल्वे मार्गाचे काम करणार आहे.

या प्रकल्पाची देखरेख नव्याने स्थापन झालेल्या शिनजियांग-तिबेट रेल्वे कंपनी (XTRC) करेल, ज्याचे नोंदणीकृत भांडवल ९५ अब्ज युआन (सुमारे १३.२ अब्ज डॉलर्स) आहे. ही कंपनी २०३५ पर्यंत ल्हासा केंद्रस्थानी ठेवून ५००० किमी लांबीचे रेल्वे नेटवर्क बांधू इच्छिते.

भारतासाठी चिंतेची बाब: अक्साई चीन हा भारताचा अविभाज्य भाग आहे, परंतु १९५० पासून तो चीनच्या ताब्यात आहे. १९५० च्या दशकात चीनने या भागात शिनजियांग-तिबेट महामार्ग (G219) बांधला, जो १९६२ च्या भारत-चीन युद्धाचे एक प्रमुख कारण बनला. त्यावेळी चीनच्या नकाशांवर हा रस्ता दिसल्यानंतर भारताला याची माहिती मिळाली, ज्यामुळे राजनैतिक तणाव वाढला. आता ही रेल्वे लाईन या भागातूनही जाईल, जी भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

LAC जवळील ही रेल्वे लाईन चीनला आपले सैन्य आणि लष्करी उपकरणे वेगाने तैनात करण्यास मदत करेल. यामुळे सीमेवर तणाव वाढू शकतो, विशेषतः अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमसारख्या संवेदनशील भागात.

चीन आपला रेल्वे मार्ग ल्हासा-न्यिंगची मार्गाच्या पलीकडे अरुणाचल प्रदेश सीमेजवळील चेंगडूपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे, जे एक प्रमुख लष्करी केंद्र आहे. याशिवाय हा रेल्वे मार्ग नेपाळ-तिबेट सीमेवरील ग्यारोंग आणि चंबी खोऱ्यातील याडोंग काउंटीपर्यंत पोहोचेल. चंबी खोरे हे संवेदनशील क्षेत्र आहे, जिथे २०१७ मध्ये चीनने रस्ता बांधल्यामुळे संघर्ष झाला होता.

आतापर्यंत भारताने या रेल्वे मार्गावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु भारत आपल्या सीमेवरील पायाभूत सुविधा देखील मजबूत करत आहे, जेणेकरून ते चीनसोबत दोन करण्यासाठी आपले सैन्य वेगाने तैनात करू शकतील.