Taliban: अफगाण पुन्हा अस्थिर! तालिबान सुप्रिमो अखुंदजादाची सत्ता उलथवणार; तख्तापालटची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 08:14 PM2023-01-30T20:14:38+5:302023-01-30T20:19:33+5:30

Afghanistan Politics: अमेरिकेने काढता पाय घेताच पुन्हा देशाचा ताबा घेणाऱ्या तालिबानमध्ये सारे काही आलबेल नाहीय. मोठ्या सत्तांतराची तयारी सुरु झाली आहे.

अस्थिरतेचा कलंक माथ्यावर असलेल्या एका मोठ्या भूभागावर ताबा असलेल्या अफगानिस्तानमध्ये पुन्हा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने काढता पाय घेताच पुन्हा देशाचा ताबा घेणाऱ्या तालिबानमध्ये सारे काही आलबेल नाहीय. मोठ्या सत्तांतराची तयारी सुरु झाली आहे.

महिलांच्या शिक्षणावर बंदीचे निर्बंध आता तालिबान सरकारचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याला अडचणीत आणणार आहे. तालिबानचे वरिष्ठ नेते अखुंदजादाला हटवण्याचा विचार करत आहेत. यामुळे पुन्हा तिथे रक्तरंजित संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानच्या शीर्ष सूत्रांनी सांगितले की, महिलांच्या शिक्षणाच्या मुद्द्यावरून वाढत्या निराशेमुळे सरकारी ऐक्य तुटण्याचा धोका आहे. यामुळे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर किंवा अमीर-उल-मोमिनीन यांच्याकडे अखुंदजादाची सत्ता सोपविण्याची तयारी केली जात आहे.

चर्चा प्राथमिक टप्प्यावर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विद्यापीठांमध्ये महिला शिक्षणावर बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाला तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवरून विरोध झाला होता. अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी आणि संरक्षण मंत्री मुल्ला मोहम्मद याकुब हे कट्टरपंथीयांच्या कारवाईच्या बाजूने नाहीत आणि त्यांना सरकार उलथून टाकायचे आहे.

अखुंदजादा यांच्याशी त्यांची चर्चा यशस्वी झालेली नाहीय. कारण अखुंदजादा महिलांवरील निर्बंध मागे घेण्याच्या मनस्थिती नाहीय. यामुळे हक्कानी आणि याकूब हे नाराज आहेत. तसेच ते देखील मागे हटण्यास तयार नाहीएत. अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय समर्थन अत्यावश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

यामुळे तालिबानचे नेते यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहेत. माध्यमिक शाळेनंतर महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली गेली आहे. तसेच सार्वजनिकपणे सर्व महिलांना डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला झाकून ठेवावे लागत आहे. सरकारने देशात मदत पुरविणाऱ्या गैर-सरकारी संस्थांमध्ये महिलांना काम करण्यास देखील बंदी घातली आहे.

हक्कानी आणि तालिबानचा संस्थापक मुल्ला मुहम्मद उमर यांचा मुलगा याकूब हे यामुळे अखुंदजादाला हटविण्याची तयारी करत आहेत. यासाठी हा उदारमतवादी गट आंतरराष्ट्रीय शक्तींशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

अफगाणिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था त्यांना पुर्वपदावर आणायची आहे. याच दोघांकडे अफगाण आणि तालिबानी सैन्याचा ताबा आहे, यामुळे मोठा भूभाग या दोघांच्यात अधिपत्याखाली येत आहे.