तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:09 IST2025-10-15T13:04:02+5:302025-10-15T13:09:35+5:30

Afghanistan Taliban Attack on Pakistan war: हिंसक संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, यावेळच्या घटनेत पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यामध्ये सीमेवर पुन्हा एकदा मोठी आणि हिंसक झटापट झाली असून, या संघर्षाने आता एका नव्या आणि अधिक गंभीर वळणावर प्रवेश केला आहे.

या हिंसक संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, यावेळच्या घटनेत पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण, अफगाण बाजूने पाकिस्तानच्या सैन्यावर थेट सोव्हिएत युनियनकालीन 'एलबरस' (Elbrus) क्षेपणास्त्र (मिसाइल) डागल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.

जुनी झालेली ही क्षेपणास्त्र प्रणाली तालिबानने पुन्हा एकदा कार्यान्वित केली आहे, ही बाब पाकिस्तानच्या लष्कर-प्रमुखांसाठी आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत चिंतेची बनली आहे.

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तालिबानच्या ताफ्यात 8K14 आणि 9M21F यांसारख्या 'एलबरस' क्षेपणास्त्र प्रणालीच्या मिसाईलची उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे.

2022 मध्ये तालिबानने 'एलबरस' आणि 'लूना-एम' या जुन्या सोव्हिएतकालीन मिसाईल सिस्टीमचे सार्वजनिक प्रदर्शन केले होते. केवळ छोटे शस्त्र नाही, तर हे मोठे युद्धसाहित्य तालिबानने पुन्हा वापरात आणल्याचे या ताज्या हल्ल्याने सिद्ध झाले आहे.

या क्षेपणास्त्राचा वापर थेट पाकिस्तानी सैन्य दलावर केला गेल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया करत आहे. त्यामुळे, केवळ सीमेवरची गोळीबार आणि छोटी चकमक नव्हे, तर आता रणनीतिक (Strategic) स्तरावरील क्षेपणास्त्र युद्ध सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

'एलबरस' हे मूळतः सोव्हिएत युनियनने 1960 च्या दशकात विकसित केलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. याला सामान्यतः Scud-B या नावानेही ओळखले जाते.

मारक क्षमता (Range): या मिसाईलची मारक क्षमता 300 ते 600 किलोमीटरपर्यंत आहे. Mach 5.0 पर्यंत वेगाने ते जाऊ शकते. 5900 किलोग्रॅम वजनाच्या या मिसाईलची लांबी सुमारे 11.2 मीटर आहे.

1979 ते 1989 दरम्यान सोव्हिएत युनियनचे सैन्य अफगाणिस्तानातून परतले, तेव्हा त्यांनी अनेक मोठी शस्त्रे आणि मिसाईल सिस्टीम तिथेच मागे सोडल्या होत्या.

यामध्ये R-17 Elbrus (Scud-B) आणि Luna-M चा समावेश होता. बराच काळ वापरात नसलेल्या या प्रणालींची तालिबानने दुरुस्ती केली आणि त्या पुन्हा चालवण्यायोग्य बनवल्या.

मिसाईलचे लॉन्च सिस्टीम, इंधन आणि मार्गदर्शक प्रणाली (Guidance System) यांची तपासणी आणि दुरुस्ती करून तालिबानने अशा मोठ्या शस्त्रास्त्रांवर नियंत्रण मिळवले आहे, जे पाकिस्तानसाठी भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकते.