अफगाणिस्तानात एका आठवड्यात 10 भूकंप; महिला-लहान मुलांचा सर्वाधिक मृत्यू, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:20 PM2023-10-13T15:20:02+5:302023-10-13T15:22:25+5:30

Afghanistan Earthquake Report: अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपात 2 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये 7 ऑक्टोबर रोजी 6 वेळा आणि 9 ऑक्टोबर रोजी 2 वेळा भूकंप आला. धक्के इथेच थांबले नाहीत, तर 11 आणि 13 ऑक्टोबरलाही देशात भूकंपाने मोठी हानी केली. शनिवार ते शुक्रवार, या कालावधीत देशभरात झालेल्या भूकंपात 2000 हून अधिक मृत्यू झाले. पश्चिम अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे झालेल्या मृत्यूंपैकी 90 टक्के महिला आणि लहान मुले आहेत.

हेरात प्रांतातील भूकंपात सर्व वयोगटातील एकूण 2 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरातच्या वायव्येस 40 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. यूएनच्या अहवालात म्हटले आहे की, भूकंपाचा केंद्रबिंदू जेंदा जान जिल्हा होता, जिथे 1294 लोकांचा मृत्यू झाला आणि 1688 लोक जखमी झाले. येथील जवळपास प्रत्येक घराचे नुकसान झाले आहे.

अफगाणिस्तानातील भूकंपात 90 टक्के मृत्यू, महिला आणि लहान मुलांचे झाले. हेरातमधील युनिसेफच्या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख सिद्दीग इब्राहिम म्हणतात, लहान मुले आणि स्त्रिया घरामध्येच राहतात. सकाळी भूकंप आला, तेव्हा अनेकांना वाटले की, कुठेतरी बॉम्बस्फोट झाला असावा. ही अफगाणिस्तानमध्ये खूप सामान्य बाब आहे. आवाजानंतर जे बाहेर होते, तेही आपापल्या घरात परतले. भूकंपात अनेक घरे कोसळल्यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले गेले.

संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करणारे जैमी नदाल म्हणतात की, भूकंप रात्रीच्या वेळी झाला असता तर मृतांमध्ये पुरुषांचाही जास्त समावेश असता. इराण जवळ असल्यामुळे अनेक पुरुष कामासाठी तिकडे जातात. दिवसभरात महिला घरातील कामात आणि मुलांची काळजी घेण्यात व्यस्त असतात. याच कारणामुळे भूकंपात जास्तीत जास्त महिला-मुले मरण पावले. बुधवारी 6.3 रिश्टर स्केलच्या दुसऱ्या भूकंपाने संपूर्ण गावे उद्ध्वस्त केली. शेकडो माती-विटांची घरे उद्ध्वस्त झाली. शाळा, दवाखाने आणि इतर सुविधाही उद्ध्वस्त झाल्या.

आपण इतिहासाची पाने पलटून पाहिली, तर आपल्या लक्षात येईल की, अफगाणिस्तानातून भूकंपाच्या अनेक येतात. भूकंपाच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तान धोक्याच्या क्षेत्रात आहे. येथे अनेक फॉल्ट लाइन आहेत आणि टेक्टोनिक प्लेटमध्ये हालचाल होते, ज्यामुळे भूकंप होतात. त्यामुळेच येथे वारंवार भूकंप होतात. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील मृत्यूचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो.