Afghanistan Crisis: भयावह! तालिबानी दहशतवादी घरात घुसले, जेवण बनवण्यास सांगितले, महिलेने नकार देताच...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:11 PM2021-08-18T12:11:53+5:302021-08-18T12:24:05+5:30

Taliban in Afghanistan, Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट पुन्हा आल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राजधानी काबूलमध्ये तालिबानी दहशतवादी घुसताच हजारो लोकांनी देश सोडण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. याचदरम्यान, एका २५ वर्षीय अफगाणी तरुणीने तालिबानी दहशतवाद्यांच्या क्रूरतेची कहाणी कथन केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट पुन्हा आल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राजधानी काबूलमध्ये तालिबानी दहशतवादी घुसताच हजारो लोकांनी देश सोडण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. याचदरम्यान, एका २५ वर्षीय अफगाणी तरुणीने तालिबानी दहशतवाद्यांच्या क्रूरतेची कहाणी कथन केली आहे.

नाझिजा नावाची महिला एक मुलगा आणि मुलीसह उत्तर अफगाणिस्तानमधील एका गावात राहत होती. तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्या घरात घुसून तिची हत्या केली. त्या घटनेची माहिती नाझिया हिची २५ वर्षीय मुलगी मनीजा हिने कथन केली आहे. १५ तालिबानी दहशतवाद्यांनी घरात घुसून मनीजा हिला जेवण बनवण्यास सांगितले होते.

मनिजा हिने सीएनएन ला सांगितले की, माझ्या आईने घाबरत घाबरत या दहशतवाद्यांना आपण गरीब असल्याचे सांगत जेवण बनवण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे संतापलेल्या दहशतवाद्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या खोलीत ग्रेनेड फेकून ते निघून गेले. यामध्ये माझ्या आईचा मृत्यू झाला.

नाझिया यांच्या घरावर झालेला हल्ला हा तालिबानी राजवटीमध्ये असलेल्या धोक्याचे एक कटू सत्य आहे. विशेष बाब म्हणजे या घटनेला फार दिवस झालेले नाही, अगदी काही दिवसांपूर्वीच १२ जुलै रोजी ही घटना घडली होती.

तालिबानने १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानमध्ये राज्य केले होते. त्यावेळी त्यांनी मुलींच्या शाळा बंद केल्या होत्या. तसेच मुलींच्या काम करण्यावर बंदी घातली होती. २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये लढाईला सुरुवात करून तालिबानची सत्ता उलथवल्यानंतर महिलांना बऱ्यापैकी सवलती मिळाल्या होत्या.

त्यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आल्याने महिलांच्या अधिकारांबाबतची जगाला चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, तालिबानने यावेळी अफगाणचा समावेश असलेले इस्लामी सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र असे असले तरी पुढे काय होईल, हे माहिती नाही, असे अफणागिस्तानच्या संसदेच्या सदस्य असलेल्या फरजाना कोचाई यांनी सांगितले.

तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी तालिबानअंतर्गत मुलींचे शिक्षण सुरू राहील. शाळा सुरू राहतील आमि महिला, मुली शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या रूपात शाळेत जाऊ शकतील, असे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षातील वास्तव वेगळेच आहे.

याआधी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य आल्यावर आदेशांची अवहेलना करणाऱ्या महिलांना मारहाण करण्यात आली होती. तसेच काही महिलांच्या हत्या, तर काहींचा बळजबरीने विवाह करण्यात आले होते.