Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 21:10 IST2025-09-13T20:44:11+5:302025-09-13T21:10:09+5:30

सलामीच्या सामन्यात धमाका; फायनल गाठली, आता....

Women's Asia Cup 2025 Final: भारतीय महिला हॉकी संघाने चीन येथील हांगझोऊ मैदानात सुरु असलेल्या आशिया कप २०२५ स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारलीये.

'सुपर फोर'मधील लढतीत गत चॅम्पियन जपानला १-१ असे बरोबरीत रोखत भारतीय महिला संघाने फायनल गाठण्याचा डाव साधधला आाहे.

जपान विरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत भारताकडून ब्यूटी डुंग डुंग हिने सातव्या मिनिटाला गोल डागत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. ५८ व्या मिनिटालाा जपानच्या संघाने आपला पहिला गोल डागत बरोबरीचा डाव साधला.

दोन्ही संघातील सामना १-१ बरोबरीत सुटल्यावर चीन आणि कोरिया यांच्यातील सामन्यावर फायनलसाठी कोण पात्र ठरणार ते अवलंबून होते. यजमान चीनच्या संघाने कोरियाला १-० अशी मात देताच भारतीय संघाला फायनलचं तिकीट मिळाले.

आता १४ सप्टेंबरला भारत आणि चीन यांच्यात जेतेपदाची लढत रंगणार आहे. याआधी सुपर फोरमध्ये हे दोन संघ भिडले होते.

चीनच्या संघाने 'सुपर फोर'मध्ये भारतीय महिला संघाला ४-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले होते. हा हिशोब चुकता करून जेतेपद पटकवण्यासाठी भारतीय महिला संघ मैदानात उतरेल.

भारतीय महिला संघाने आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत १२-० असा धुव्वा उडवत दिमाखदार सुरुवात केली होती. आता फायनलमध्ये धमक दाखवून जेतेपद पटकवण्याची मोठी संधी भारतीय संघाला आहे.

चक दे! इंडिया....या तोऱ्यात सर्वोत्तम खेळाचा नजराणा पेश करत भारतीय महिला संघ घरच्या मैदानात चीनला शह देत इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल.