सफरचंदावर का लावतात स्टिकर?; ९९% लोकांना माहीत नाही सत्य; किमतीशी नाही, आरोग्याशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 02:06 PM2024-06-13T14:06:43+5:302024-06-13T14:15:48+5:30

९९ टक्के लोकांना फळांवर स्टिकर का चिकटला आहे हे माहीत नाही. त्याबाबत जाणून घेऊया...

अनेकदा बाजारातून सफरचंद किंवा इतर काही फळ विकत घेताना त्यावर स्टिकर लावल्याचं पाहिलं असेल. ही फळं घेताना विक्रेता हा नेहमीच ती एक्सपोर्ट क्वालिटीची असल्याचं सांगतो. त्यामुळे अनेकदा ती महाग देखील असतात. स्टिकर लावलाय म्हणजे नक्कीच चांगली असतील असं आपणही म्हणतो आणि ती फळं विकत घेतो.

सफरचंदाच्या स्टिकर्सवर लिहिलेल्या गोष्टी आपण वाचत नाही किंवा प्रत्येक स्टिकर्स लावण्यामागचा अर्थ काय असा विचारही करत नाही. यामुळेच ९९ टक्के लोकांना फळांवर स्टिकर का चिकटला आहे हे माहीत नाही. त्याबाबत जाणून घेऊया...

दिल्लीचे सुप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ अमुल्य नागेंद्र सांगतात की, आजकाल केवळ सफरचंदांवरच नाही तर संत्र्यावरही स्टिकर्स लावले जात आहेत. स्टिकर्ससह चमकदार सफरचंद पाहून, लोकांना वाटते की ते महाग असले पाहिजेत.

अनेक वेळा दुकानदार स्टिकर लावलेल्या सफरचंदांसाठी जास्त दर आकारतात, पण स्टिकर्स हे थेट आरोग्याशी निगडीत असतात, किमतीशी नाही. जेव्हा तुम्ही सफरचंद खरेदी करायला जाल तेव्हा तुम्ही सफरचंदावरील स्टिकर जरूर वाचा कारण त्यात अशी माहिती लिहिली आहे जी तुम्हाला तुम्ही नेमकं काय खात आहात हे सांगते.

नागेंद्र सांगतात की, फळाची किंमत आणि एक्सपायरी डेट व्यतिरिक्त, फळांवर चिकटलेल्या स्टिकर्सवर PLU म्हणजेच Price look-up code लिहिलेला असतो. हा कोड फळाची गुणवत्ता दर्शवतो आणि फळ कसं पिकलं सांगतं. PLU कोडमध्ये ३ मुख्य विशेष कोड आहेत.

काही सफरचंद किंवा फळांवर स्टिकरवर चार अंकी क्रमांक लिहिलेला असतो. हा कोड ४ या अंकाने सुरू होतो, जसं की ४०२६, ४९८७ इ. म्हणजे कीटकनाशके आणि रसायनांचा वापर करून अशी फळे पिकवली गेली आहेत.

फळं पिकवण्यासाठी कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ही फळे सर्वात स्वस्त आहेत. हे खाल्ल्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कीटकनाशकांचा वापर केलेली फळ खरेदी करत आहात.

काही फळांच्या स्टिकर्सवर पाच अंकी क्रमांक लिहिलेले असतात, परंतु हा कोड ८ अंकाने सुरू होतो, जसे की ८४१३१ किंवा ८६५३२. या फळांमध्ये जनुकीय बदल करण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे.

ही फळे देखील सेंद्रिय नसतात आणि जीएम पिकांची फळं म्हणून दिसतात. ही कीटकनाशकांपेक्षा थोडी महाग असू शकतात, त्यांचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.

काही फळांमध्ये ९ अंकापासून सुरू होणारा 5 अंकी कोड असतो. फळावर ९३४३५ असं लिहिले आहे. म्हणजे ही फळे सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत. यामध्ये कोणत्याही कीटकनाशकांचा वापर करण्यात आला नाही. याला सर्वात सुरक्षित फळ म्हटलं जातं आणि किंमतीत महाग असूनही ते आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे.

अमुल्य नागेंद्र सांगतात की, आजकाल भारतातील बाजारपेठेत सफरचंद आणि संत्री इत्यादींवर स्टिकर्स असतात, पण त्यावर कोणताही कोड लिहिण्याऐवजी त्यावर एक्सपोर्ट क्वालिटी, बेस्ट क्वालिटी किंवा प्रीमियम क्वालिटी असे शब्द लिहिलेले असतात. हे बनावट स्टिकर्स आहेत.

खरेदीदारांना फसवण्यासाठी असं केलं जातं. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही असे सफरचंद खरेदी कराल तेव्हा ते काळजीपूर्वक खरेदी करा आणि ते खाण्यापूर्वी ते गरम पाण्याने चांगले धुवून घ्या. स्टिकर असलेला भाग कापून टाका.