Coronavirus: कुटुंबातील एक सदस्य संक्रमित झाला तर घरातील सर्वांना कोरोना होतो का? नवीन रिपोर्ट प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 20:54 IST2020-08-02T20:52:22+5:302020-08-02T20:54:41+5:30

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाचा आकडा साडेचार लाखांपर्यंत पोहचला आहे.

कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची लागण होते, त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन आणि मास्क घालणं गरजेचे आहे असं वारंवार आवाहन आरोग्य विभागाकडून केले जाते.

संसर्गजन्य रोग असल्याने कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली तर घरातील सर्व सदस्यांना कोरोना लागण होऊ शकते हे मानणं चुकीचे आहे असं एका अभ्यासक्रमातून समोर आलं आहे.

गांधीनगर स्थित भारतीय जनआरोग्य संस्थेच्या अभ्यासात म्हटलं आहे की, कुटुंबातील कोणताही एक सदस्य कोरोनाबाधित असेल तरी त्यांच्या घरातील ८०-९० टक्के सदस्यांना कोरोनाची लागण होऊ शकत नाही.

याबाबत संस्थेचे निर्देशक दिलीप मावलकर यांनी सांगितले की, अभ्यासात असे संकेत मिळतात की, कुटुंबातील अन्य सदस्यांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी एका प्रकारची प्रतिरोधक क्षमता विकसित झालेली पाहायला मिळते. सर्वजण कोरोनाच्या जाळ्यात अडकले हे मानणं चुकीचे ठरेल असे ते म्हणाले.

काही मिनिटांमध्ये कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्याने त्याची लागण होऊ शकते. जर असं झालं असतं तर कोरोनाबाधित कुटुंबाच्या घरातील सर्वांना कोरोनाची बाधा झाली असती. काही मोजकेच कुटुंब असे आहेत ज्यांच्या घरात सगळ्यांना बाधा झाली आहे.

काही असे कुटुंब आहेत ज्यांच्यातील एका सदस्याचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला आहे तर अन्य कोणालाही कोरोनाची बाधा नाही. हा अभ्यास कोविड १९ कुटुंबातील संक्रमण या विषयावर जागतिक स्तरावर प्रकाशित झालेल्या १३ रिपोर्टच्या आधारे करण्यात आला आहे.

कुटुंबातील एका सदस्यापासून दुसऱ्या सदस्यापर्यंत कोरोना संक्रमणाचा दर १०-१५ टक्के आहे, कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली परंतु उर्वरित ८०-९० टक्के सदस्यांना हा आजार झाला नाही. त्यामुळे या सदस्यांमध्ये कोरोनाशी लढण्याशी प्रतिरोधक क्षमता विकसित होत असावी असा अंदाज लावला जात आहे.

भारतीय जनआरोग्य संस्थेच्या रिपोर्टमध्ये कुटुंबातील एका सदस्यापासून दुसऱ्या सदस्याला कोरोना बाधा होण्याची शक्यता फक्त ८ टक्के आहे. तसेच घरातील अंथरुण वापरल्यामुळेही बाधा होते हा संसर्गदरही कमी आहे. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींना बाधा होण्याची शक्यता असते. त्याचे प्रमाण १५-२० टक्के आहे.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येक माणसांत वेगवेगळी रोगप्रतिकारक क्षमता असते. कुटुंबात आपण एकमेकांशी अंतर ठेवत नाही, मास्क घालत नाही. लक्षण समोर आल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत ३-५ दिवसांचे अंतर असते, त्यादरम्यान कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या संपर्कात येतात तरीही अनेकदा संक्रमण होत नाही हे आढळून आलं आहे.

















