रशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:37 PM2020-09-18T23:37:48+5:302020-09-18T23:52:34+5:30

रशियन कोरना लशीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रशियाची Sputnik V ही कोरोना लस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही लस घेतलेल्या प्रत्येक सात पैकी एका स्वयंसेवकात साइड इफेक्ट्स दिसत आहेत. खुद्द रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी हा खुलासा केला आहे.

मॉस्को टाइम्सला दिलेल्या एका निवेदनात मुराश्को यांनी सांगितले, की लस टोचून घेणाऱ्यांपैकी 14 टक्के लोकांत या लशीचे साइड इफेक्ट्स दिसून आले आहेत.

आरोग्यमंत्र्यांच्या हवाल्याने मॉस्को टाइम्सने म्हटले आहे, ही लस घेणाऱ्या प्रत्येक सात पैकी एका व्यक्तीत अशक्तपणा आणि मसल्स पेनसारखे साइड इफेक्ट्स दिसून येत आहेत.

मात्र, अशा प्रकारच्या साइड इफेक्ट्ससंदर्भात पूर्वीपासूनच माहिती होती आणि हे साइड इफेक्ट्स दुसऱ्या दिवशीच ठीकही झाले होते, असे मुराश्को यांनी म्हटले आहे.

या लशीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरीच चाचणीचे परीणाम 4 सप्टेंबरच्या द लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित झाले होते. 76 लोकांना ही लस दोन टप्प्यात देण्यात आली होती.

Sputnik V ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. तसेच 21 दिवसांत स्वयंसेवकांच्या शरीरात कुठल्याही गंभीर साइड इफेक्ट्स शिवाय अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.

'द लँसेट'ने या लशीच्या साइड इफेक्टसंदर्भातही सांगितले आहे. यात, 58 टक्के लोकांनी लस टोचलेल्या जागी वेदना होत असल्याची तक्रार केली, 50 टक्के लोकांना ताप आला, 42 टक्के लोकांना डोकेदुखीची समस्या जाणवली, 28 टक्के लोकांनी अशक्तपणाची, तर 24 टक्के लोकांनी मसल्स पेनची तक्रार केली आहे.

लँसेटने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटले आहे, लस घेतल्यानंतर 42 दिवसांच्या आत स्वयंसेवकांत दिसून आलेली लक्षणे अत्यंत सौम्य होती, तसेच त्यांच्यात फारसे गंभीर साइड इफेक्ट्सदेखील दिसून आले नाही. प्रत्येक लसीचे असे साइड इफेक्ट्स दिसून येतात, असे या अभ्यासाच्या लेखकांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वीच 50 वैज्ञानिकांनी रशियन लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लँसेट मॅगझीनला एक पत्र लिहिले होते. यानंतर या मॅगझीनने या अभ्यासाच्या लेखकांना वैज्ञानिकांच्या प्रश्नाची उत्तरे द्यायला सांगितले होते.

भारतातील नागरिकांसाठीही रशियन लशीसंदर्भात विचार सुरू आहे. तसेच नुकताच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF)ने डॉक्टर रेड्डी, या भारतीय कंपनीशी 10 कोटी लशींचे डोस तयार करण्यासंदर्भात करार केला आहे.

परीक्षण पूर्ण झाल्यानंतर, वर्ष अखेरपर्यंत या लशीच्या पुरवठ्याला सुरुवात होऊ शकते. या लशीला मंजुरी देण्यापूर्वी भारतातही तिचे परीक्षण केले जाईल.

गामालेया सायंटिफिक रिसर्च इंस्टिट्यूटने Sputnik V व्हॅक्सीन 11 ऑगस्टला लॉन्च केली होती. लॉन्चपासूनच ही लस वादात अडकली आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यावरील चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक देशांनी या लशीच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.