आरोग्यासाठी गुणकारी असा 'मुळा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:28 PM2019-10-20T15:28:54+5:302019-10-20T15:37:37+5:30

जेवणात तोंडी लावण्यासाठी अनेकजण कांद्यासोबत मुळाही खातात, पण अनेकांना मुळ्याचे अनेक फायदे कुणाला माहीत नसतात. मुळा केवळ आपल्या तोंडाल चव आणतो असे नाही तर याने आपलं आरोग्यही चांगलं राहतं. चला जाणून घेऊ मुळा खाण्याचे आणखीही काही फायदे....

पौष्टिक तत्वांनी भरपूर मुळा : मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्व असतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. १०० ग्रॅम मुळ्यामध्ये १८ ग्रॅम कॅलरी, ०.१ ग्रॅम फॅट, ४.१ ग्रॅम कार्बोहायड्रेट, १.६ ग्रॅम डायट्री फायबर, २.५ ग्रॅम शुगर, ०.६ ग्रॅम प्रोटीन, ३६ टक्के व्हिटॅमिन सी, २ टक्के कॅल्शिअम, २ टक्के आयर्न आणि ४ टक्के मॅग्नेशिअम असतं.

शरीरातील घाण काढतो बाहेर : मुळा किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फार फायदेशीर मानला जातो आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासही त्याने मदत होते. मुळ्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं, जे पोटदुखीवर रामबाण उपाय मानलं जातं. यासोबतच पचनक्रिया चांगली राहण्यासही मुळा खाल्ल्याने मदत होते. पोटासंबंधी समस्या असलेल्यांनी जर मुळ्याच्या रसात आल्याचा रस आणि लिंबाचा रस मिश्रित करुन प्यायल्यास याने भूक वाढते.

पचनक्रियेसाठी फायदेशीर : पोटासाठी मुळा फार फायदेशीर मानला जातो. मुळ्याच्या रसामुळे पोटाचे वेगवेगळे आजार दूर होतात. जर तुम्हाला पोटात जडपणा वाटत असेल तर मुळ्याच्या रसात थोडं मीठ घालून प्यायल्यास फायदा होईल. तसेच ताजा मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही चांगली होते.

लिवरलाही होतात फायदे : मुळा खाल्ल्याने लिवरची क्रिया चांगली होते. लिवरचा त्रास झाल्यावर नियमीतपणे तुम्ही जेवण करताना मुळ्याचं सेवन करायला हवं. सोबतच कावीळ झाला असेल तर नियमीत मुळा खाण्याचा सल्लाही दिला जातो. त्यामुळे रोज नियमीतपणे मुळ्याचं सेवन केल्यास तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर : मुळ्यामध्ये अॅंटी-हायपरटेंसिव गुण आढळतात, जे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे शरीरातील मेंसोडियम-पोटॅशिअमचा स्तर बॅलन्स ठेवतो आणि याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.

मुळ्याचे अनेक फायदे असले तरी ज्यांना वाताची समस्या असते त्यांनी मुळा खाऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण मुळ्याने वात वाढते असे, सांगितले जाते. त्यामुळे अशा लोकांनी मुळ्याचं सेवन करु नये.