Mucormycosis: कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:03 IST2021-05-27T12:55:09+5:302021-05-27T13:03:53+5:30
Mucormycosis early symptoms: ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य नाही आहे. मात्र वेळीच लक्ष दिले नाही तर हा आजारसुद्धा जीवघेणा ठरू शकतो.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोरोनामुक्त झाल्यानंतर फंगल इंफेक्शनचे प्रमाण वाढत चालले आहे. ब्लॅक, व्हाईट आणि आता यलो फंगसने लोकांच्या समस्येत भर घातली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर या संसर्गामुळे रुग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे.
कोरोनाचे जे रुग्ण दीर्घकाळ आयसीयूमध्ये राहतात. तसेच ज्यांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन दिला गेला. तसेच ज्या रुग्णांना स्टेरॉइडच्या अधिक मात्रा दिल्या गेल्या, रक्तातील वाढलेली साखर आणि जे लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतात, अशा लोकांना कोरोनाचा धोका अधिक असतो.
मात्र ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य नाही आहे. मात्र वेळीच लक्ष दिले नाही तर हा आजारसुद्धा जीवघेणा ठरू शकतो. कोरोनाच्या बऱ्या होत असलेल्या रुग्णांनी काही लक्षणांबाबत खूप सावध राहण्याची गरज आहे. ही लक्षणे ब्लॅक फंगसच्या आजाराची सुरुवात असू शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
सातत्याने डोके दुखणे
कोरोनामधून बरे होत असताना जर तुमचे डोके सातत्याने दुखत असेल आणि तुम्हाला एकप्रकारचा दबाव जाणवत असेल तर हे ब्लॅक फंगसचे सर्वात प्राथमिक लक्षण असू शकते. फंगस नाकामधून डोक्यापर्यंत पोहोचू शकते.
चेहऱ्याच्या एका बाजूला सूज
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ब्लॅक फंगसमुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. त्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला सूज, वेदना आणि खालच्या भागात जडपणा वाटू शकतो. नेक्रोसिसमुळे त्वचा लाल होऊ शकते. याच्याकडेसुद्धा ब्लॅक फंगसचे लक्षण म्हणून पाहिले पाहिजे.
रंग बदलणे, काळा पापुद्रा तयार होणे
ब्लॅक फंगसच्या एका लक्षणामध्ये चेहऱ्यावरील विकृतीचाही समावेश आहे. नाकाच्या चारही बाजूंना काळा पापुद्रा तयार होणे. चेहऱ्याचा रंग खराब होणे, डोळ्यांमध्ये जडपणा वाटणे ही शरीरामध्ये ब्लॅक फंगसचा फैलाव होत असल्याची लक्षणे आहेत. असे कुठलेही लक्षण दिसल्याच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
नाक बंद होणे
ब्लॅक फंगस हा आजार सर्वप्रथम नाकावाटेच शरीरात प्रवेश करतो. गंभीर रुग्णांमध्ये हा थेट फुप्फुसांवर हल्ला करतो. नाक बंद होणे, श्वास घेण्यासाठी जोर लावावा लागणे किंवा श्वसनासंबंधीची कुठलीही समस्या दिसल्यात त्वरित सावध झाले पाहिजे.
दात कमकुवत होणे
काही लोकांमध्ये ब्लॅक फंगस खूप वेगाने वाढू शकतो. त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. तर काही रुग्णांनी दात सैल होण्यासारख्या लक्षणांचीही नोंद केली आहे. काही लोकांना जबड्यांशी संबंधित अडचण दिसून येते. अशा परिस्थितीत ऑपरेशनची आवश्यकता भासू शकते.
कोविड-१९ बरा झाल्यानंतर रुग्णाला कुठल्याही अन्य व्हायरल किंवा फंगल संसर्गापासून वाचवण्यासाठी तोंडाची स्वच्छता कायम राखणे आवश्यक आहे. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर टुथब्रश बदलावे. तसेच नियमितपणे आपले तोंड आणि चेहऱ्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे.
तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपले ब्रश इतरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. ब्रश आणि टंग क्लिनरला नियमितपणे अँटिसेप्टिक माऊथवॉशने स्वच्छ केले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.