भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:24 IST2025-10-24T18:17:30+5:302025-10-24T18:24:02+5:30

गेल्या काही वर्षांत जगभरातील अनेक जोडप्यांना आई वडील होण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. पुरुषांमध्ये वीर्य गुणवत्ता कमी होणे हे याचे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते.

जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये वीर्य गुणवत्ता कमी होत आहे, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे.शुक्राणूंची संख्या कमकुवत किंवा कमी असल्यामुळे महिलांना गर्भवती राहण्यात अडचणी येत आहेत. त्यात आयव्हीएफमध्ये अपयश आणि वंध्यत्व यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मात्र यातच जागतिक स्तरावर पुरुषांमध्ये वीर्य गुणवत्ता कमी होत असल्याने पुरुषांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र दक्षिण भारतीय पुरुषांवरील एका नवीन अभ्यासात पूर्णपणे उलट चित्र आढळून आले आहे.

मणिपाल येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजने केलेल्या एका नवीन अभ्यासातून वेगळे चित्र समोर आले आहे. गेल्या १७ वर्षांत दक्षिण भारतीय पुरुषांमधील वीर्य गुणवत्ता कमी झालेली नाही. जगभरातील शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही एक दिलासादायक बातमी आहे.

या अभ्यासात जवळजवळ १२,००० पुरुषांच्या डेटाचा आढावा घेण्यात आला. भारतात विशेषतः दक्षिणेत पुरुषांची प्रजनन क्षमता स्थिर राहिली आहे हे या अभ्यासाच्या रिपोर्टमधून दिसून येते.

स्टडी रिपोर्टमध्ये काय आढळलं? - अमेरिकन जर्नल ऑफ मेन्स हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात २००६ ते २०२२ दरम्यान दक्षिण भारतीय पुरुषांच्या शुक्राणूंच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

हे पुरुष कस्तुरबा मेडिकल कॉलेजमधील एंड्रोलॉजी लॅबमध्ये प्रजनन चाचणीसाठी आले होते. अभ्यासात शुक्राणूंची संख्या, त्यांचा वेग, सर्व्हाइवल रेट आणि स्ट्रक्चर यांचा अभ्यास करण्यात आला.

या डेटाची तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, १७ वर्षांमध्ये शुक्राणूंच्या गुणवत्तेत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही. याचा अर्थ दक्षिण भारतीय पुरुष जगाच्या काही भागांमध्ये शुक्राणूंच्या गुणवत्तेत घट होत असल्याच्या धोक्याच्या बाहेर आहेत.

संशोधनात काय आढळले? - यावरून असे दिसून येते की, दक्षिण भारतीय पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता स्थिर आहे असं अभ्यास करणारे सतीश अडिगा म्हणाले. पुरुष वंध्यत्व वाढत आहे, परंतु हे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होण्याऐवजी इतर घटकांमुळे असू शकते असंही त्यांनी सांगितले.

हा अभ्यास जागतिक शुक्राणू संकटाच्या कल्पनेला आव्हान देतो. पुरुष प्रजनन क्षमता समजून घेण्यासाठी प्रादेशिक डेटा खूप महत्वाचा आहे असं जर्मन लेखक स्टीफन श्लाट म्हटलं.

टॅग्स :आरोग्यHealth