Monkeypox : लहान मुलं आणि गर्भवतींना मंकीपॉक्सचा सर्वाधिक धोका; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:04 PM2022-07-26T18:04:30+5:302022-07-26T18:27:02+5:30

Monkeypox : मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता मंकीपॉक्सने जगाचं टेन्शन वाढवलं आहे.

मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण दिल्लीत नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी केरळमध्ये तीन जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. तिघेही संयुक्त अरब अमिरातीतून परतले आहेत.

चौथ्या व्यक्तीने अलीकडच्या काळात परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे दिल्लीतील एका व्यक्तीला घरी असतानाही मंकीपॉक्सची लागण कशी झाली हा चिंतेचा विषय आहे. सध्या सर्व बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांना त्याचा जास्त धोका असल्याने त्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.

तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास मंकीपॉक्सचा धोका वाढतो. मुले आणि गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. याआधी 1970 मध्ये 9 वर्षांच्या लहान मुलामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

गर्भवती महिलांनाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन काँगोमध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये 216 महिलांचा समावेश होता. या संशोधनात सहभागी 5 पैकी 4महिलांचा गर्भपात झाला होता. त्याच वेळी, गर्भात वाढणाऱ्या मुलांमध्येही मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली.

महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाही हा आजार हेाऊ शकतो. यासाठी बाधित व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणे कधीही चांगले. स्वतःला लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून आजाराबाबत खात्री करून घ्यावी.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा. रोज हळदीचे दूध प्या. अन्नपदार्थ शेअर करू नका. तसेच, ब्रश, टूथपेस्ट, टॉवेल इत्यादी गोष्टी शेअर करू नका. संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवा.

सर्दी, खोकला आणि मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीपासून लगेच वेगळे राहणेच जास्त चांगले. घराबाहेर पडताना मास्क लावा. याच्या मदतीने तुम्ही कोरोना व्हायरसचाही संसर्गही टाळू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसतानाच, जगभरात मंकीपॉक्स या आजाराने थैमान घातलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा आजार जागतिक आरोग्य आणीबाणी (Health Emergency) म्हणून घोषित केला आहे.

भारतातदेखील मंकीपॉक्सचे आतापर्यंत चार रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंकीपॉक्स हा धोकादायक आजार असला, तरी आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास मंकीपॉक्सचे रुग्ण वेगाने बरे होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

मंकीपॉक्सच्या लक्षणांपैकी सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे, शरीरावर चिकनपॉक्सप्रमाणे फोड दिसून येणं. मंकीपॉक्स झाल्यानंतर वेगाने बरं होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं आहे.

तुमची इम्युनिटी बूस्ट (Immunity Booster food) करण्यासाठी काही पदार्थांचा समावेश आहारात करणं आवश्यक आहे. यामध्ये तुळशीची पानं, पुदिना आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ यांचा समावेश होतो.

(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)