दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 00:14 IST2025-05-28T00:02:41+5:302025-05-28T00:14:22+5:30
Bed Rotting Depression: 'बेड रॉटिंग' ही संज्ञा अलीकडच्या काळात विशेष चर्चेत आली आहे. करण्यासारखं काहीच नसेल तर झोप लागू दे किंवा न लागू दे, या व्यक्ती अंथरुणात लोळत राहतात.

Bed Rotting Symptoms: एखादी व्यक्ती दिवसभर किंवा दिवसातले अनेक तास इतर काहीही न करता फक्त लोळत असेल तर त्याला 'बेड रॉटिंग' असं म्हणतात. अशा व्यक्ती सहसा कुठलंही उपयोगी काम करत नाहीत. त्या एकतर लोळून पुस्तकं वाचतात किंवा सिनेमे, वेबसिरीज पाहतात.
खाण्यापिण्यासाठीही त्या व्यक्ती आपल्या अंथरुणातून बाहेर येत नाहीत. इतर काहीच करण्यासारखं नसेल तर त्या बेडवर लोळून मोबाइलवरच्या एका अॅपमधून दुसऱ्या अॅपमध्ये डोकावत, निरूद्योग स्क्रोल करत राहतात. करण्यासारखं काहीच नसेल तर झोप लागू दे किंवा न लागू दे, या व्यक्ती अंथरुणात लोळत राहतात.
अनेकदा अशा व्यक्तींना मानसिक थकवा, ताणतणाव, नैराश्य असू शकतं. त्यांची दिनचर्या बेशिस्त असेल, तरी हे होऊ शकतं किंवा त्यांना दिवसभर कामाचा अत्यंत ताण असल्यामुळे स्वतःसाठी अजिबात वेळ काढता येत नसेल तर त्यातूनही ही सवय लागू शकते.
काहींना जबाबदारीपासून दूर जाण्याचा मार्ग म्हणूनही 'बेड रॉटिंग' हा पर्याय अधिक सोपा वाटतो. प्रत्येक व्यक्तीसाठी विश्रांती ही गोष्ट अनिवार्य असते.
प्राणीसुद्धा विश्रांती घेतात, तिथे दिवस-रात्र स्पर्धेच्या युगात धावणाऱ्या माणसांची काय कथा... पण ठराविक वेळ विश्रांती घेणं आणि इतर काहीच न करता सतत विश्रांतीच घ्यावीशी वाटणं किंवा नुसतं लोळत राहणं हे माणसांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकतं.
शरीराची हालचाल झाली नाही तर शारीरिक, मानसिक स्थैर्य बिघडतं. त्यामुळे त्यांच्या सामाजिक वर्तुळावरही त्याचा परिणाम होतो.
रोज ठराविक वेळ विश्रांती घेणं आवश्यक असलं, तरी आपण आपल्या नकळत 'बेड रॉटिंग' करत असू तर मनावर आलेली मरगळ झटकून, नियमित व्यायाम, आहार, झोप, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद अशा गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं. ते जमवण्यात अडचणी येत असतील तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणंही आवश्यक आहे.