CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:12 PM2021-04-14T17:12:38+5:302021-04-14T17:26:01+5:30

आतापर्यंत तब्बल 10 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. स्पुतनिक - V लशीला परवानगी दिल्यानंतर, आता लोकांना घरो-घरी जाऊन लस देण्याची योजना सुरू आहे. (Corona Vaccine Update Many pharma companies sent a proposal to health ministry for doorstep vaccination in india)

देशात स्पुतनिक-V लशीच्या एन्ट्रीनंतर आता घरो-घरी जाऊन लस टोचण्यची तयारी होत आहे. देशातील अनेक कंपन्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे डोर स्टेप व्हॅक्सिनेशनसाठी संपर्कदेखील केल्याचे समजते. पुढील काही दिवसांत यासंदर्भात निर्णय होईल, असा अंदाज आहे.

देशात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच लसीकरण प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 10 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. स्पुतनिक - V लशीला परवानगी दिल्यानंतर, आता लोकांना घरो-घरी जाऊन लस देण्याची योजना सुरू आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांत देशातील लोकांना मोठ्या संख्येने लस दिली जावी, यासाठी 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठीही परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी परवानगी मिळताच, घरो-घरी जाऊन लोकांच्या लसीकरणालाही परवानगी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे, असे वृत्त अमर उजाला वेब पोर्टलने प्रसिद्ध केले आहे.

अनेक औषध निर्माता कंपन्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रस्ताव दिला आहे, यात या कंपन्यांनी खासगी कंपन्यांच्या लशी आणि सरकारी लशी लोकांच्या घरी जाऊन देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. मात्र, यासाठी या कंपन्यांनी प्रती व्यक्ती 25 ते 37 रुपयांपर्यंत शुक्ल घेण्याची परवानगी या प्रस्तावातून मागितली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी अद्याप कुठल्याही कंपनीला परवानगी देण्यात आलेली नाही.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, घरो-घरी जाऊन लोकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली, तर सुरुवातीच्या टप्प्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आपल्या सरकारी नेटवर्कचाच वापर करेल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे, की देशातील वयस्क लोकांना पुढील काही महिन्यात पूर्णपणे व्हॅक्सीनेट केले जाईल. यासाठी केंद्र सरकारची संपूर्ण तायरी झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही महिन्यात आणखी काही लशी देण्याची परवानगी मिळेल. देशात आवश्यकतेनुसार, लवकरच इतर वयोगटातील लोकांनाही व्हॅक्सीनेट करण्याची योजना सुरू आहे.