ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही

By ओमकार संकपाळ | Published: May 14, 2024 05:16 PM2024-05-14T17:16:53+5:302024-05-14T17:21:41+5:30

Benefits Of Surya Namaskar : पारंपरिक पद्धतीने केला जाणारा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. यामध्ये सामाविष्ट असलेल्या विविध आसनांच्या मदतीने तुम्ही तुमचे शरीर तंदुरूस्त ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे.

सूर्यनमस्कार म्हणजे घरबसल्या केली जाणारा जिम अथवा आपल्या सोयीनुसार केला जाणारा व्यायाम होय. सूर्यनमस्काराचे नाना फायदे आहेत. यामुळे शरीर सदृढ राहण्यास मदत होतेच शिवाय वजनही नियंत्रणात राहते. सूर्यनमस्कार केल्याने लवचिकता, ताकद आणि एकूणच फिटनेस सुधारण्यास मदत करते. नियमित सूर्यनमस्कार केल्यास शारीरिक आणि मानसिक संतुलन वाढण्यास मदत होते.

सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, जो लवचिकता, ताकद आणि तग धरण्याची क्षमता वाढवतो. या योग क्रमामध्ये आसन आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम यांचा समावेश होतो. स्नायूंना ताण मिळाल्याने शरीर अधिक लवचिक बनते. तसेच तुमची शारीरिक ताकद देखील वाढते. कालांतराने तुमची सहनशक्ती देखील वाढत जाते.

सूर्यनमस्कार करण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नाही. जर तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. नियमित सूर्यनमस्कार केल्याने तुमचा मणका निरोगी राहतो, पाठदुखीच्या समस्येला पूर्णविराम मिळतो. एकूणच चांगल्या आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हे एक चांगले पाऊल आहे.

नियमित सूर्यनमस्कार केल्यास वजन वाढीच्या समस्येपासून सुटका होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण सूर्यनमस्कार करतात. सूर्यनमस्कार करत असताना विविध हालचाली होत असल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात. चयापचय वाढल्याने पचनक्रिया सुधारते. पण, यासाठी निरोगी आहाराचे सेवन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

रात्री पुरेशी झोप झाल्यानंतर सकाळच्या वेळी सूर्यनमस्कार केल्याने मन प्रसन्न राहते. यामुळे केवळ शारीरिक फायदा होत नसून, मन शांत राहते, यामाध्यमातून ध्यानाचाही सराव होतो. तुमच्या श्वासावर आणि वाहत्या हालचालींवर लक्ष केंद्रित केल्याने मन प्रसन्न राहते आणि तणाव कमी होतो. अशा स्थितीत मन एकाग्र असते.

सूर्यनमस्कारामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि ते हृदयासाठी चांगले असते. ही आसने नियमित केल्यास हृदय अधिक कार्यक्षमतेने कार्य करते. याचा फायदा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी होतो. तसेच शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पोहोचण्यास मदत होते. एकूणच रक्तदाबाचा धोका कमी होतो.

सूर्यनमस्कार करत असताना प्रत्येक हालचालीदरम्यान विशिष्ट पद्धतीने श्वास घेतला जातो. यामुळे तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते, त्याला चालना मिळाल्याने शरिरात जास्त हवा घेऊ शकता. ऑक्सिजनचे हे वाढलेले सेवन तुमच्या शरीराला कार्यक्षमतेने कार्य करण्यास मदत करते आणि ते तुमच्या श्वसनाचे आरोग्य सुधारते.

नियमित सूर्यनमस्कार केल्याने मन एकाग्र राहते. लक्ष विचलित होत नाही. एखादे आसन करताना ती संबंधित पोझ तुम्हाला पूर्णपणे व्यग्र ठेवते. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यावर तुमचे मन भर देते. यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष जात नाही. कालांतराने ही वाढलेली एकाग्रता दैनंदिन कामात अथवा अभ्यासात मदत करू शकते.

सूर्यनमस्कार करत असताना श्वासोच्छवासामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. एकूणच तुमचे शरीर अधिक कार्यक्षमतेने अन्न पचवू शकते. यामुळे पोटदुखी, लठ्ठपणा किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांची शक्यता कमी असते. म्हणून नियमित सूर्यनमस्कार केल्याने पचनक्रिया सुधारते.

सूर्यनमस्कार शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करते. जेव्हा तुम्ही ही योगासने नियमितपणे करता तेव्हा तुम्ही विविध प्रणालींना उत्तेजित करत असता. आसनांचा सराव करत असताना घामाच्या माध्यमातून शरीरातील विषारी द्रव बाहेर येत असतो. या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेमुळे तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटू शकते.