जाणून घ्या, प्रमोद सावंत यांचा डॉक्टरपासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:37 PM2019-03-19T15:37:46+5:302019-03-19T16:14:49+5:30

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत.

सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. तथापि, त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे.

तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा या रसायनशास्त्राच्या शिक्षिका आहेत. त्या बीकोलीममधल्या श्रीशांतादुर्गा सेकंडरी स्कूलमध्ये शिकवतात.

. तसेच गोव्यातील भाजपा महिला मोर्चाच्या त्या अध्यक्षा आहेत. प्रमोद सावंत हे पर्रीकरांचेही अत्यंत विश्वासू होते.

पर्रीकरांना एखाद्या सरकारी कार्यक्रमाला जाणं शक्य नसल्यास ते प्रमोद सावंत यांना पाठवत असत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले.

पहिल्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही; मात्र नंतर ते पाळी (आताच्या साखळी) मतदारसंघातून निवडून आले. 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या प्रमोद यांनी कोल्हापुरातून आयुर्वेदातील पदवी घेतली. काही काळ त्यांनी उसगाव येथे दवाखानाही चालवला होता.

ते समाजसेवेसाठी संस्थाही त्याकाळी चालवत होते व आजही चालवतात. समाजसेवेतील पदव्युत्तर पदवीही त्यांनी पुणे विद्यापीठातून मिळवली आहे. मृदुभाषी पण कर्तव्यकठोर म्हणून ते ओळखले जातात.