'हा' भावनिक फोटो तुम्हाला शिकवेल जगण्याचा खरा अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 11:03 AM2019-09-26T11:03:22+5:302019-09-26T11:08:09+5:30

जगात सर्व माणसं एकसमान नसतात... स्वभावानं, रुपानं, शरीररचनेनं प्रत्येक माणसात भिन्नता असते.. त्यामुळे आपण असे का, तो तसा का? याचा फार विचार न करता आहे त्यात समाधान मानून आयुष्याचा आनंद घेत राहणेच आपल्या हातात आहे. ज्याच्याकडे काहीच नाही तोही दुःखी आणि ज्याच्याकडे सर्वकाही असूनही दुःखी... अशी सध्याची परिस्थिती आहे.

पण, आज आपण 22 महिन्याच्या अशा मुलाला भेटणार आहोत की एक हात नसूनही तो आपल्याला जगण्याचा खरा अर्थ समजावून जातो.

जोसेफ टिड्ड असे या चिमुकल्याचे नाव आहे... जन्मताच त्याचा डावा हाताच्या मनगटाखालचा भाग नाही... आपल्यात काही तरी कमी आहे, हे त्याला आता कळत नसले तरी आपण कोणापेक्षा कमी नाही, याची जाण कुटुंबीयांनी त्याला करून दिलेली आहे.

जोसेफला आपल्या अशा शरीराची लाज वाटू नये, म्हणून त्याचे पालक सतत त्याला प्रेरणा देत असतात. जोसेफला फुटबॉलची भारी आवड आणि त्याला कार्सोन पिकेटचा खेळ पाहणे खूप आवडते.

कार्सोन पिकेट ही अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघातील बचावपटू आहे आणि तिच्याही डाव्या हाताच्या मनगटाखालील भाग जन्मजात नाही. असे असूनही तिनं त्याचा बावू न करता आयुष्य कसे जगावे याचा वस्तुपाठ जगासमोर ठेवला आहे.

त्यामुळेच जोसेफच्या पालकांनी कार्सोन पिकेटचा सामना पाहण्यासाठी त्याला नेले आणि तेथे त्याची कार्सोनशी भेट करून दिली.

कार्सोननेही जोसेफची भेट घेत त्याला हसवले... तू इतरांपेक्षा वेगळा असलास तरी कमकुवत नाहीस, अशी प्रेरणा तिनं त्याच्यात जागृत केली.