'रिअल' लाईफमध्ये रिंकू राजगुरू कशी? शुटिंग संपलं की 'अकलूज' गाठते, आई-वडिलांबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:02 IST2025-12-30T15:51:55+5:302025-12-30T16:02:11+5:30
आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीबद्दल रिंकू राजगुरू म्हणाली...

आपल्या पहिल्याच 'सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू. आज ती मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे.

कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना तिने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होण्याचा मान मिळवला.

रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचं खरं आयुष्य कसं असेल? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना कायम पडत असतो. नुकत्याच 'मटा कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिच्या कामाबद्दल अतिशय प्रांजळपणे भावना व्यक्त केल्या.

रिंकू म्हणते, "लोकांना माझं फिल्मी आयुष्य दिसतं. पण, माझं खरं आयुष्य अत्यंत साधं आहे. चित्रीकरण संपलं की मी थेट अकलूजला माझ्या घरी जाते. आई-वडिलांसोबत घालवलेला वेळ, सकाळ-संध्याकाळचा घरचा चहा आणि जेवण, वाचन करणे, सिनेमे पाहणे आणि प्राण्यांच्या सहवासात राहिल्यानं खरा आनंद मिळतो".

रिंकूच्या यशात तिच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. तिने सांगितलं की, तिच्यावर कधीही कोणतीही बंधनं घातली गेली नाहीत. उलट, तिच्या पालकांनी तिला एक मोलाचा सल्ला दिलाय, तो म्हणजे "जे मनापासून आवडेल तेच काम कर. ज्या कामात आनंद नाही, त्या कामाला काहीच अर्थ नाही".

आजही दिवसभरात घडलेली प्रत्येक गोष्ट रिंकू आपल्या आईला फोन करून सांगते. रिंकू म्हणाली, "त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे".

रिंकू म्हणाली की, "काम नेहमी तिथेच करावं जिथे समाधान आणि आनंद मिळतो. केवळ नाव किंवा प्रसिद्धीसाठी काही करण्यापेक्षा मनःशांती अधिक महत्त्वाची आहे".

अलिकडेच १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'आशा' या चित्रपटानं प्रेक्षकांचं कौतुक मिळवलं. या चित्रपटात तिने एका 'आशा' सेविकेची भूमिका साकारली आहे.

रिंकूच्या आशा' चित्रपटातून महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास उलगडण्यात आलाय.

रिंकूच्या या भूमिकेतील सहजता आणि प्रामाणिकपणा इतका कमाल आहे की, यासाठी तिला राज्य शासनाचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा अत्यंत मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
















