पार्टनर कसा हवा? गौतमी पाटीलनं स्पष्टच सांगितलं; लग्नाच्या प्रश्नावर दिली 'अशी' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:00 IST2026-02-15T16:52:57+5:302026-02-15T17:00:27+5:30
गौतमीला लग्नासाठी मुलाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर गौतमी पाटील खुलासा करत म्हणाली...

लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. गौतमीचा स्टेज शो असो वा म्युजिक व्हिडीओ त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

'सबसे कातिल गौतमी पाटील' म्हणून ती चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. गौतमीच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी जाणून घेण्यास तिच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो.

अनेकदा गौतमीला तिच्या सोशल मीडियासह सर्वत्र तिच्या लग्नाबद्दल आणि कसा जोडीदार हवा, याबद्दल विचारलं जातं. त्यात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं लग्न आणि होणाऱ्या नवऱ्याबद्दल अपेक्षा सांगितल्या आहेत.

एबीपी माझाच्या 'कॉफी विथ कौशिक' या व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल पॉडकास्टमध्ये गौतमी पाटीलनं वैयक्तिक आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.

गौतमीला तिच्या व्हॅलेंटाईनबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने अतिशय स्पष्टपणे सांगितले की, तिच्या आयुष्यात सध्या अशी कोणतीही व्यक्ती नाही.

गौतमी म्हणाली, "सध्या माझा अजिबात कुणीही व्हॅलेंटाईन नाही. माझे कार्यक्रम आणि काम सुरू आहे. व्हॅलेंटाईन डे असं काही मी साजरा करत नाही. यात मला खरंतर फारसा रस नाही".

स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत नसली, तरी हा दिवस कसा साजरा करावा, यावर गौतमीने आपले मत मांडले आहे.

गौतमीच्या मते, मोठ्या पार्ट्यांपेक्षा एकमेकांना दिलेला वेळ महत्त्वाचा आहे. ती म्हणाली, "कुठेतरी फिरायला जाऊन, एकत्र छान जेवण करून आणि एकमेकांसाठी वेळ देणं, एवढं पुरेसं आहे. त्यातूनच खरा आनंद मिळतो".

गौतमीच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली असते. यावर गौतमीने स्पष्ट केले की, सध्या तरी तिचा लग्नाचा कोणताही विचार नाही. लग्नाच्या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली, "एवढ्या लवकर मी लग्न करणार नाही".

पार्टनरबाबत गौतमी म्हणाली, "माझा पार्टनर नेहमी समजूतदार असावा. माझ्या आयुष्यात आतापर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. माझ्या भूतकाळाला स्वीकारणारा, समजून घेणारा असावा. हीच माझी मुख्य अपेक्षा आहे".

















