IN PICS : एक होती ‘रजनी’! कमी वयात प्रिया तेंडुलकर निघून गेली, पण तिला विसरणं शक्य नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:20 IST2021-10-19T13:07:20+5:302021-10-19T13:20:38+5:30

Priya Tendulkar Birth Anniversary : ‘रजनी’ने तिला देशभर लोकप्रिय केले. लिहिता लिहिता, अभिनय करता करता ती अचानक निघून गेली ती कायमचीच... आज प्रिया तेंडुलकर यांचा वाढदिवस...

अनेक वर्षांपूर्वी ‘रजनी’ ही मालिका टीव्हीवर यायची. आजच्या पिढीला ही मालिका माहित नसावी. पण 80 च्या दशकातील या मालिकेने पे्रक्षकांना वेड लावलं होतं. प्रिया तेंडुलकर या मालिकेची नायिका. या मालिकेमुळे प्रिया तेंडुलकर हे नाव घराघरात पोहोचलं.

आज प्रिया तेंडुलकर आपल्यात नाहीत. आपल्यात असत्या तर आज आपल्यासोबत स्वत:चा वाढदिवस साजरा करत असत्या. दिग्गज नाटककार, लेखक विजय तेंडुलकर हे प्रिया यांचे वडील. पण विजय तेंडुलकरांची कन्या अशी ओळख निर्माण न करता प्रिया तेंडुलकर अशी स्वत:ची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती.

प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. पण पुढे ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला. गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले.

प्रिया तेंडुलकर यांची अभिनयाची कारकिर्द म्हणायला छोटी होती. पण या छोट्याशा कारकिर्दीतही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.

हम पाँच या मालिकेतील प्रिया तेंडुलकर यांची भूमिका आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. 1973 मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि यानंतर 20 हून अधिक चित्रपटांमध्ये त्या झळकल्या.

सस्ती दुल्हन महंगा दुल्हा या हिंदी चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली होती. त्रिमूर्ती, गुफ्त, और प्यार हो गया, नामो निशान अशा अनेक चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या.

गोंधळात गोंधळ, माळावरचे फूल, मायबाप, मुंबईचा फौजदार, माहेरची माणसे,थोरली जाऊ, राणीनं डाव जिंकला अशा मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या.

1985 साली करण राझदानससोबत त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी ‘रजनी’मध्ये एकत्र काम केलं होतं. यादरम्यान त्यांच्यात प्रेम बहरलं होतं. अर्थात हे लग्न फार काळ टिकलं नाही.

अभिनयासोबत साहित्यक्षेत्रातही प्रिया तेंडुलकर हे नाव प्रसिद्ध झालं. ज्याचा त्याचा प्रश्न, पंचतारांकित, जन्मलेल्या प्रत्येकाला, आणि असं ही ही त्यांची गाजलेली पुस्तके. यापैकी पहिल्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कारही मिळाला होता. प्रिया तेंडुलकर या उत्तम चित्रकार आणि कॉस्च्युम डिझायनरही होत्या.

वयाच्या 42 व्या वर्षी प्रिया तेंडुलकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यावेळी त्या ब्रेस्ट कॅन्सरशीही लढत होत्या. 19 सप्टेंबर 2002 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.